तो क्षण - भाग - २

आणि तो दिवस आला ज्यादिवशी स्मितानं आपल्या मनाची घट्ट तयारी केली. ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा दिनेशला खूपच ब्लीडिंग झाल होतं. त्याचा चेहरा एकदम काळवंडला होता, डोळे आत गेले होते, तो बिछान्यावर नुसताच निपचित पडुन होता. कुशाल त्याच्या बाजूलाच बसला होता. स्मिता वॉर्डमध्ये येताच कुशाल उठून तिच्याजवळ आला आणि तिला बाहेर घेऊन गेला. मग तिचा हात हातात घेत म्हणाला.
"आज बाबांची तब्येत फारच बिघडली आहे, सकाळी डॉक्टर चेक करून गेले आणि त्यांच्यामते अजून फार तर एखाद दिवस निघेल."
त्याचे डोळे भरून आले होते मग तसाच आवंढा गिळत तो पुढे म्हणाल.
"तू आत जा पण त्यांना तुला ह्यातल काहिही माहिती आहे हे दाखवु नकोस. मी जरा डॉक्टरांना भेटुन येतो."
स्मिता काचेच्या तावदानातून निपचित पडलेल्या दिनेश कडे एकटक पहात होती, कुशालच बोलण झालं तसं ती कोणतीही प्रतिक्रिया न देता अगदी शांतपणे आतमध्ये गेली. थोडावेळ नुसतच दिनेशच्या बाजुला येऊन उभी राहिली, मग हळूच त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसली. तिनं दिनेशचा हात आपल्या हातात घेतला तसं दिनेशन वळून तिच्याकडे पाहिलं आणि कसनुसं एक स्मित हास्य दिलं. त्याला बोलता येतं नव्हत पण त्याचे डोळे बरच काहि बोलत होते. स्मिताच्या डोळ्यात पाणी भरुन आलं, तसं दिनेशन तिला हळूच मान हालवून रडू नकोस अस सांगीतलं. मग स्मिताने आपले डोळे पुसले आणि दिनेशला म्हणाली.
"मला माहिती आहे मी आता जे तुला सांगणार आहे ते ऐकुन तू मला कधीच माफ करणार नाहिस पण मी ते तुला सांगितल नाहि तर माझं मन मला कधीच माफ नाहि करणार."
दिनेश नुसताच प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पहात राहिला.
"मी आजपर्यंत तुझ्यापासून काहिच लपवून ठेवल नाहि पण एक गोष्ट मी तुला कधीच सांगितली नाहि किंवा सांगु शकले नाहि."
आणि तिनं सांगायला सुरुवात केली.
"आपलं लग्न व्हायच्या आधी माझ्या आयुष्यात सलील होता, आणि आम्ही दोघं लग्न पण करणार होतो. पण दोघांच्या घरच्यांनी केलेल्या प्रचंड विरोधामुळे ते शक्य झाल नाहि. पुढे आपलं लग्न झाल आणि सलील कामाच्या निमित्तानं मुंबई सोडून दिल्लीला रहायला गेला. आपल्या लग्नानंतरसुध्दा तो जेव्हा जेव्हा मुंबईला येत असे, मला भेटत असे पण फक्त एक चांगला मित्र म्हणून. तू नेहमी कामानिमित्त बाहेरगावी जायचास त्यामुळे आम्हाला ते शक्य होत होतं. म्हणजे तुझ्यासमोर पण मला त्याला भेटण्यात आणि तुझी त्याच्याशी ओळख करून देण्यात मला काहिच गैर वाटलं नसतं पण मला कुठल्याही प्रकारचे गैरसमज नको होते. हळूहळू जसे दिवस जात होते तसं आमच भेटण पण कमी झाल होत तो आता मुंबईला फार कमी येत असे तू पण पुष्कळवेळा नसायचा मी अगदी एकटि पडुन जायचे. त्यातच आपल्याला बाळं होत नव्हत त्यामुळे आपल्या दोघांचीही मानसिक अवस्था बिघडतं चालली होती. आपल्यात अगदी छोट्या छोट्या कारणावरून कुरबुरी व्हायला लागली होती. तू तर बाहेर निघुन  जायचा पण मी मात्र घरात नुसतीच कुढत बसत असे."
ती बोलत होती पण तिची नजर दिनेशकडे नव्हती, आणि दिनेश, त्याच्याकरता तर हे सगळच अगदी अनभिज्ञ होतं.
"दिवस असेच चालले होते, आपल्यातला दुरावा वाढत होता. मी खूपच खचून गेले होते. आणि त्या दिवशी आपल अगदी छोट्याशा कारणावरून खूप मोठे भांडण झालं, तू तसाच रागाच्या भरात बडोद्याला निघुन गेलास आणि संध्याकाळी अचानक सलील घरी आला, त्याला अस अचानक समोर पाहुन माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी त्याच्या मिठीत खूप रडले तो क्षणच तसा होता. त्यादिवशी तो रात्रभर घरीच होता आणि दुसर्‍यादिवशी सकाळि निघुन गेला. दोनच दिवसात मला सलीलचा एका अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळली. मी पार कोसळुअन गेले पण मी हळुहळु स्वताला सावरलं. दिनेश, कुशाल तुझा मुलगा नाहि तो सलीलचा मुलगा आहे. डॉक्टरांच्या रीपोर्टप्रमाणे तू कधीच मुल जन्माला घालु शकणार नव्हतास."

स्मितानं आपल बोलण पूर्ण केल आणि चोरट्या नजरेने दिनेशकेडे पाहिलं, तस त्यान तिचा हात घट्ट दाबला, त्याच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसत होता. त्यान काहि तरी बोलण्याकरता तोंड उघडल तसा त्याच्या तोंडातून फेस यायला लागला. स्मितान पटकन इमर्जन्सीची बेल दाबली तशी नर्स धावत आली आणि तिच्या पाठोपाठ डॉक्टर आणि कुशाल आले. पण तोपर्यंत सगळच संपल होत अवघ्या काही मिनिटातच दिनेशची प्राणज्योत मालवली. त्याला जबर ह्रदयाचा झटका आला होता. स्मिता सुन्न होऊन दिनेशच्या पार्थिवाकडे पहात होती.

स्मिता आपल्या विचारांच्या तंद्रीतून एकदम बाहेर आली जेव्हा कुशालन तिला हाक मारली. कुशाल सिमरनसोबत तिच्या समोर बसत तिला म्हणाला.
"मी उद्याच निघेन म्हणतोय, माझ उद्या रात्रीच्या फ्लाईटच तिकिट पण कन्फॉर्म झालय. सुट्टीपण संपलीय. सिमरनच असं म्हणण आहे कि ती काहि दिवस इथेच तुझ्यासोबत राहिल."
"नको बेटा मी राहिन इथेएकटि तू लवकर कायमची या घरात ये. कुशाल, आपल्याला लग्न ह्या वर्षिच उरकून घाव लागेल नाहीतर पुढे तीन वर्ष काहिच करता येणार नाहि."
"ठिक आहे आपण ठरवु नंतर."
मग गप्पांच्या ओघात कुशाल स्मिताला म्हणाला.
"आई, पण मला एका गोष्टीच राहुन राहुन आश्चर्य वाटतय, बाबा माझ्यावर कधीही चिडल्याच आठवत नाहि, पण त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये शेवटच्या क्षणाला मी जेव्हा त्यांच्यासमोर गेलो तेव्हा त्यांनी रागानं माझ्याकडे पाहिल आणि अचानक तोंड फिरवून घेतल. मला हि गोष्ट खूपच मनाला लागलीय. काय झाल होत तेव्हा नक्की?"
पण स्मिताकडे, कुशालच्या ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हत. 

समाप्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया नोंदवा