"काय ग ए भवाने, आल्या आल्या बसली का हादडायला. आजची कमाई कुठे हाये? किती पैस मिळाले?" चींगीनं तिच्याशी काहिहि न बोलता कमरेला लावलेली पैशाची पुरचूंडि दिली, आईनं ती झटकन तिच्याकडुन ओढुन घेतली, मग एका बाजुला जाउन ते सगळे सुट्टे पैशे मोजु लागली, चांगले पंचवीस रुपये होते ते. पैशे मोजुन झाल्यावर तिच्या चेहर्यावर एकदम हसू आल, मग चींगीच्या डोक्यावरुन हात फिरवत तिला म्हाणाली.
"गुणाची पोर गं माझी, चांगली कमाई केलीस आज आता नाम्याच्या बाजुला जाउन थोड झोप." चींगीनं तिला काहिच प्रतिक्रिया दिली नाहि जणु तिला हे रोजचच होत. तिन बाजुच्याच एका प्लॅस्टिकच्या बाटलीतुन पाणी प्यायल, आणि नाम्याच्या बाजुला जाऊन झोपली.
दुसर्या दिवशी सकाळि, चींगीच्या आईन तिला उठवल ते तिच्या पेकाटात एक लाथ मारुनच चींगी डोळे चोळत तशीच उठुन बसली अणि बसल्या बसल्याच पेंगायला लागली. तेवढ्यात तिची आई परत तिच्यावर खेकसली तशी चींगी उठुन उभी राहिली. मग समोरच्या प्लॅस्टिकच्या बाटलीतल थोड पाणी तिन तोंडावर मारल आणि कोपर्यातल्या चुलीच्या जवळ ठेवलेला एक पाव ग्लासातल्या चहाबरोबर खाल्ला. तेवढ्यात तिची आई तिच्यावर परत ओरडली.
"निघ कि लवकर आता, नाम्याला मी दूध पाजलय जास्त रडायला लागला तर पाणी दे कुठे तरी." चींगीन मग नाम्याला कसबस कडेवर उचलल आणि झोपडिच्या बाहेर आली तेवड्यात तिची आई तिला परत ओरडुन म्हणाली
"आनी हो दुपारी सरळ घरी ये गाव भटकत बसु नकोस." तिन आईच्या बोलण्याकडे लक्ष न देता सरळ माहिम स्टेशनचा रस्ता पकडला. स्टेशनवर पोहोचताच समोरच उभ्या असलेल्या बोरीवली लोकलमध्ये ती चढली आणि आपल्या रोजच्या उदरनिर्वाहाला लागली. साधारण दुपारी तीन वाजता ती नेहमीप्रमाणे लोकलमधुन माहिम स्टेशनवर परत उतरली आणि आपल्या झोपडिच्या दिशेने निघाली, तेवढ्यात तिच लक्ष समोरच उभ्या असलेल्या रघु, लती, रानी, जीतु, आणि सोनु यांच्याकडे गेलं, ती सगळि चींगीच्या ओळखीचीच मुल होती, मग ती कशीबशी नाम्याला सांभाळात त्या मुलांच्या घोळक्यात शिरली. त्यातली सोनु सगळ्यांना तिच्याकडची एक नक्षीदार पर्स दाखवत होती, चींगीनपण ती पर्स पाहिली आणि ती सोनुला म्हणाली.
"सोने, छान पर्स आहे ग हि, कोनी दिली?"
"माझ्या बानं आनली मला." सोनू थोड्या ठसक्यातच तिला म्हणाली, तसा जीतु म्हणाला
"माझ्या बान पन मला काल एक चाकलेट आनल होत." मग हळु हळु सगळे आपआपले वडिल त्यांच्या करता काय काय करतात ते सांगायला लागले, चींगी मात्र सगळ शांतपणे ऐकत तिथेच उभी होती. तेवढ्यात लती चींगीला म्हणाली
"चींगे तुझा बाप नाहि आनत तुला काहि?" चींगीचा चेहरा एकदम पडला, तेव्हा रघु म्हणाला.
"तिला कुठं बाप हाये. तिचा बाप कोन हे तिलाच म्हाइत नाय." चींगी नाम्याला कंबरेवर सांभाळत तशीच तिथ खाली मान घालुन उभी होती. तेव्हा रानी म्हणाली
"माझी आई सांगत व्ह्ती कि हिचा आनि ह्या नाम्याचा बाप पन वेगळे वेगळे हायेत." त्यावर सोनु म्हणाली.
"म्हंजी गं?" तस रानीनं मान हलवत काय माहित अस केल आणि सगळे जण जोरजोरात हसायला लागले. आता मात्र चींगीचे डोळे पाणावले आणि ती तशीच रडत तिच्या झोपडिच्या दिशेने चालु लागली. झोपडित पोहोचल्यावर तिन आत पाहिल तर तिची आई घरात नव्हती. तिन नाम्याला बाजुच्या वळकटिवर ठेवल आणि ती स्वता: त्याच्या बाजुला बसली. तेवढ्यात तिची आई आत आली, चींगीला अस चेहरा उतरवुन बसलेल बघुन ती म्हणाली.
"काय ग चींगे कोनाशी भांडुन आलीस? आनि आजची कमाई कुठं हाय?" चीगीन तिच्या कमरे भोवतिची पैशाची पुरचुंडि काढुन आईला दिली. तिची आई नेहमीप्रमाणे पैसे मोजु लागली, पैसे मोजुन झाल्यावर तिच्या चेहर्यावर एकदम हसू आल, मग चींगीकडे पहात ती म्हणाली
"तीस रुपे, लई छान कमाई केलीस आज. जा ती चपाती खा आधी." मग आईन नाम्याला आपल्या छातीशी घेतल आणि दूध पाजायला लागली. मग चींगीपण आईच्या जवळ आली आणि तिला हळुच म्हणाली.
"आये, माझा बाप कोन गं?" ती खूप आशेने आईच्या उत्तराची वाट पहात राहिली, पण आई काहिच बोलली नाहि. चींगीन परत थोड लाडात येत तिला विचारल
"ए आये, सांग कि माझा बाप कोन ते? कुठं असतो त्यो?"
"असेल कुठल्या तरी जेलमधी पडलेला, का ग तुला का ह्या चोकशा? दोन टायमाच गिळायला मिळत ना तुला, मग बाप कशा पायी हवा?" ती चींगीवर एक्दम खेकसली. चींगी काहिच न बोलता समोर ठेवलेली ती पोळि आणि चटणी खायला लागली. चींगीचा उरलेला सगळा दिवस फक्त जेलमध्ये असलेल्या तिच्या वडिलांचाच विचार करण्यातच गेला.
दुसर्या दिवशी सकाळि चींगी नेहमीपेक्षा जरा लवकरच ऊठली. आपल सगळ आवरुन ती नाम्याजवळ गेली तर तो आजुनहि झोपलेलाच होता मग तिन त्याला उचलण्याकरता हात लावला तर त्याच अंग तिला खूप गरम लागल. तिन बाहेर जाउन तिच्या आईला बोलावुन आणल, नाम्याला चांगलाच ताप भरला होता, चींगीला नाम्याची खूप कळजी वाटायला लागली होती म्हणुन ती आईला म्हणाली.
"आये आज मी नको जाउ का? मी थांबते कि नाम्या संगे घरीच."
"आनी मग पैसे कोन आनेल तुझा बा?" चल निघ इथुन मी बघते त्याच्याकडे आज." चींगीची आई तिच्यावर बरसली.
मग चीगी झोपडितुन बाहेर पडली, आणि थेट स्टेशनचा रस्ता पकडला आपल्या रोजच्या भीक मागण्याच्या कामाला जाण्यासाठि. साधारण दुपारी दोन वाजता ती नेहमीप्रमाणे चर्चगेट लोकलमधुन माहिमला उतरली आणि आपल्या झोपडिकडे जायला निघाली तेवढ्यात समोर तिला रानी दिसली. चींगी रानीकडे गेली आणि तिला म्हणाली.
"रानी, मला तुला काहितरी सांगायचय, चल ना जरा बाजुला." अस म्हणत ती तिला थोड आडोशाला घेऊन गेली.
"हा बोल काय सांगायचय ग तुला."
"रानी मला माझ्या बाचा पत्ता लागला."
"काय!.... कुठं हाये तो?"
"जेलमधी."
"चोरटा हाये का तो?"
"मला नाय ठाव, पन मला त्याला भेटायचय."
"पन तू त्याला कशी भेटनार? आनि त्याला ओलखनार तरी कशी?"
"काल पाहिला ना सपनात त्याला, माझ्यावानीच दिसतो अगदि" चींगी चेहर्यावर थोड हसु आणत तिला म्हणाली
"तुला म्हायती हाये जेल कुठे असत ते?"
"कुठल जेल?"
"म्हाईत नाय, कुठलहि जेल."
रानीन नकारार्थी मान हालवली, मग थोडा विचार करुन ती म्हाणली.
"अग तुला तो मागच्या गल्लीतला किशा म्हाइत हाये का? तो गेला व्हता कि मागच्या महिन्यात जेलमधी."
"कसा काय ग?"
"त्यानी टेशनात एका बाईची पर्स मारली, मग काय पोलिसांन पकडला धूधुतला आनि टाकला जेलमधी." चींगीचा चेहरा थोडा खुलला मग जरा विचार करुन ती रानीला म्हणाली
"रानी, जर मी पर्स मारली तर मला पन जेलमधी टाकतिल का गं?"
"मग टाकनारच." रानी तिला म्हणाली. मग थोड इकडे तिकडे बघत चींगी तिला म्हणाली.
"चल मग मी पन कोनाची तरी पर्स मारते. पन कोनाची पर्स मारु ग मी?"
"ती बघ ती समोर एक बाई बसली हाये ना तिची पर्स मार तू. तिन आपली पर्स बघ कशी बाजुला ठेवली हाये, जा उचल आनी लाग पळायला. आनि हो जरा हळुच पळ म्हंजी पोलिस तुला पकडतिल" चींगीन मोठ्या उत्साहान तिच्याकडे पाहिल आणि म्हणाली.
"रानी, माझ्या आयेला सांग कि चीगी गेली तिच्या बाला भेटायला जेलमधी." रानीनं पण मोठ्या उत्साहान होकारार्थी मान हलवली.
मग चींगी बेंचवर बसलेल्या त्या बाईच्या दिशेने निघाली, त्या बाईंनी आपली पर्स बाजुलाच ठेवली होती आणि ती शेजारी बसलेल्या एका दुसर्या बाईशी काहितरी बोलत होती. चींगी त्या बाईच्या जवळ गेली, तिन समोर पाहिल, समोरच्या बाकड्यावर दोन पोलिस हवालदार बसले होते. तिन पुन्हा मागे वळुन रानीकडे पाहिलं, रानीन खूणेनीच तिला जा पुढे हो अस सांगीतल. मग थोडा धीर करत चींगी त्या बाकड्याच्या जवळ गेली आणि झटकन त्या बाईची पर्स उचलली आणि पळायला लागली.
पुढिल भाग लवकरच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
प्रतिक्रिया नोंदवा