चींगी

पूर्वसुत्र

चींगीन जशी त्या बाईंची पर्स उचलली तशा त्या बाई जोरात "चोर चोर" असं ओरडत चींगीच्या मागे धावु लागल्या. समोर चालु असलेला हा गोंधळ पाहुन ते दोघं हवालदारसुध्दा उठून चींगीला पकडायला धावले. चींगी पळत स्टेशनच्या बाहेर आली पण त्या हवालदारानं एव्हाना तिला पकवलं पण होत. तेवढ्यात त्या बाई पण तिथं धापा टाकत पोहोचल्या. मग ते हवालदार त्या दोघींना घेउन जवळच असलेल्या पोलिसस्टेशनवर घेऊन आले. तिथे आल्यावर इंन्स्पेक्टर साहेबांनी त्या बाईंना बसायला सांगीतलं, त्यांची पर्स त्यांना परत दिली आणि आत सगळ व्यवस्थीत आहे ना ह्याची खात्री करुन घ्यायला सांगीतली. जेव्हा त्या बाईंनी पर्समधलं सगळ सामान बरोबर आहे अस सांगीतल तेव्हा साहेबांनी चींगीकडे पाहिल आणि म्हणाले.
"काय ग तू चोरली का पर्स ह्या बाईंची?"
"व्हय" चींगी न घाबरता ठसक्यात बोलली.
"असं, बरीच अकड आहे ह्या चिमुरडीला, थांब तुझी सगळि अकड आता बाहेर काढतो. नाव काय तुझं?"
"चींगी"
"बापच नाव"
"म्हाइत नाय" मग साहेब त्या बाईंकडे पहात म्हणाला.
"बघा कशी पोर जन्माला घालतात साधे ह्यांना आपले आई बाप पण माहिती नसतात." मग त्या बाईच साहेबांना म्हणाल्या.
"मी एक सोशलवर्कर आहे, हिला पुढच्या सगळ्या प्रोसेस मध्ये अडकवण्यापेक्षा मला असं वाटत तुम्ही हिला बालसुधारगृहात टाकाव." मग थोडा विचार करत त्या साहेबांनी एका हवालदाराला कागदावर काहि तरी लिहुन दिला आणि चींगीला शिवडिच्या बालसुधारगृहात एका महिन्याकरता घेउन जायला सांगीतल. हे ऐकुन चीगीचा चेहरा एकदम खुलला ती त्या साहेबांना म्हणाली
"म्हंजी तुमि मला जेल मधी टाकनार?" तेवढ्यात त्या बाई तिला म्हणाल्या.
"जेल नाहि तुला ते बालसुधारगृहात एका महिन्याकरता पाठवत आहेत."
"ते काय असत? नाय मला जेल मधीच जायचय तिथं माझा बा हाये.." ह्यावर तो साहेब वैतागून म्हणाला
"हो हो तुला जेल मध्येच टाकतो आहे. तू कुठे राहतेस ते सांग म्हणजे आम्ही तुझ्या घरी कळवतो तसं."
"गरज नाय त्याची रानीन सागीतल असेन माझ्या आयेला."

पोलिसस्टेशनमधुन बाहेर पडताना चींगी खूप खूष दिसत होती, तिला वाटत होत कि तिला एखाद्या जेलमध्येच नेत आहेत जिथे ती तिच्या ’बापाला’ भेटु शकेन. थोड्याच वेळात चींगी आणि तो हवालदार शिवडिच्या त्या बालसुधारगृहात पोहोचले. बालसुधारगृह म्हणजे एक बैठि इमारतच होती, पुढे छान मोठं आंगण आणि मध्ये मुख्य इमारत. आतमध्ये गेल्यावर चौकीदार त्यांना बालसुधारगृहाच्या अधीक्षक बसतात त्या केबिन मध्ये घेउन गेला. केबिनमध्ये विशेष असं काहिही सामान नव्हतं, कोपर्‍यात एक भलं मोठं कपाट होतं, त्याच्या बाजुला पाणी प्यायचा माठ, आणि बाजूच्याच भिंतीवर गांधीजी आणि मदर तेरेसा ह्यांचे फोटो लावले होते. बरोबर ह्या फोटोंच्या समोरच एक टेबल खुर्ची होती जेथे एक जाड जुड बाई वर्तमानपत्र वाचत बसल्या होत्या. ते आतमध्ये येताच त्या बाईंनी त्यांच्याकडे पाहिल मग त्या हवालदारानं साहेबांनी दिलेला कागद देत त्या बाईंना म्हणाला.
"मोरे बाई ह्या पोरीला इथे महिनाभर ठेवायला सांगितलं आहे साहेबांनी."
मोरेबाईनी डोळ्यावरचा चष्मा नीट करत तो कागद वाचला आणि चींगीकडे पहात म्हणाल्या.
"काय ग चोरी केलीस का?"
"व्हय" चींगी त्यांना म्हणाली. मग मोरेबाईनी कपाटातून एक भलं मोठे रजीस्टर काढल आणि त्यात काहितरी लिहू लागल्या. नंतर त्यांनी त्या हवालदाराची रजिस्टरमध्ये सही घेतली आणि खुणेनेच त्याला जायला सांगीतल आणि टेबलवरची बेल वाजवली, थोड्याच वेळात तिथं निळ्या रंगाची साडी घातलेली एक मध्यम वयाची बाई आली. मोरेबाई तिला म्हणाल्या.
"सुनंदा, हिला वॉर्ड नं ४ मध्ये पावनीबरोबर ठेव. कालच ती गुलाबो गेली ना, मग तिचेच कपडे दे हिला." असे म्हणत त्यांनी परत आपलं डोक वर्तमानपत्रात घातल. मग सुनंदान चींगीचा हात पकडला आणि तिला आतमध्ये घेउन गेली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळे मुलं आपापल्या वॉर्डमध्ये गेली होती त्यामुळे बाहेरच्या पटांगणात कुणीच दिसत नव्हत. मग चींगी हळूच सुनंदाला म्हणाली.
"ह्या जेलमधी माझा बा हाये का?"
"जेल? हे सुधारगृह आहे आणि तुझा बा? तो कसा असेल इथे? इथे फक्त लहान मुलंच असतात."
"म्हंजी हे जेल न्हायी का?"
"नाहि हे बालसुधारगृह आहे. इथे तुझ्यासारखे छोटे मोठे गुन्हे केलेली लहान मुलंच असतात."
"पण मला तर जेलमधी जायाच व्हतं, तो बडा सायेब तेच बोलला व्हता. आता मला माझा बा कसा मिळनार?" चींगीचे डोळे पाणावले होते. ती तिथे तशीच थबकली, तसं सुनंदान तिला जवळ जवळ खेचतच वॉर्ड न. ४ कडे नेलं. मग त्या वॉर्डचा दरवाजा उघडुन तिला आत ढकलल आणि पळायचा प्रयत्न केलात तर तंगड तोडून हातात देईन असा दम भरुन ती निघून गेली. चींगी तशीच तिथे बसून रडायला लागली. वॉर्ड नं ४ हि एक छोटीशी खोली होती. त्या खोलीत फक्त दोन बाजुला दोन बिछाने जमिनीवर अंथरले होते आणि एका कोपर्‍यात एक जुनाट पाण्याचा माठ होता. बाजूच्याच भिंतीवर एक मंद दिवा चालु होता. त्या खोलीला एक पण खिडकी नव्हती, फक्त जाण्यायेण्याच्या दाराला असते तेवढीच खिडकी होती. चींगीच रडणं थोड्याच वेळात थांबल मग तिनं त्या खोलीत सगळीकडे नजर फिरवली. तिनं पाहिल बाजूच्याच गादीवर तिच्यापेक्षा साधारण दोन तीन वर्षानी मोठी असलेली एक मुलगी गाढ झोपली होती. थोड्याच वेळात चींगीपण आपल्या बिछान्यावर झोपी गेली तिला इतकी गाढ झोप लागली कि ती रात्रीच्या जेवणाकरता पण उठली नाहि. सकळि पण तिला दचकून जाग आली जेव्हा तिनं एक मोठा आवाज ऐकला, ती उठून बिछान्यात बसून राहिली, तेवढ्यात खोलीत ती काल रात्री झोपलेली मुलगी आली. ती मुलगी तशी काळि सावळिच होती पण अंगानं मात्र धिप्पाड अशी होती. ती चींगीच्या जवळ आली आणि तिला म्हणाली.
"कोन ग तू"
"चींगी, आनि तू"
"मी पावनी, तू इथ कशी आलीस?"
"माज्या बापाला भेटायला."
"तुझा बाप! तो काय करतो इथे?"
"तो इथ नाय, तो मोठ्या जेलमधी हाये"
"हो! मग मोठ्या जेलमध्ये का नाहि गेलीस?"
"त्या पोलिसान इथेच आनल."
तेवढ्यात दरवाज्यात सुनंदा येऊन उभी राहिली तिनं दोघींनाही बाहेर बोलावल. मग तिनं चींगीला दुसरे कपडे बदलायला दिले आणि दोघींनाही खाली पटांगणात यायला सांगीतल. पुढे काहि दिवस असेच गेले. ह्या दिवसात चींगीची आणि पावनीची चांगलीच मैत्री झाली होती. दोघी सतत एकत्रच असतं, जर कोणी चींगीला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याची गाठ धिप्पाड अशा पावनीशी असे. पहिले काहि दिवस सुधारगृहात चींगीला तिच्या आईची आणि नाम्याची आठवण येत होती, पण हळुहळू ती त्या वातावरणात रमायला लागली होती. सुधारगृहात चींगीला बर्‍याच चांगल्या गोष्टि शिकायला मिळाल्या. सुधारगृहात रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना होत असतं. मग सगळि मुलं आपआपली नेमून दिलेली काम करत असतं. दुपारी आणि रात्री सगळी मुलं एकत्रच जेवायला बसत. दुपारच्या जेवणानंतर सगळेजण एका हॉलमध्ये जमत जिथे त्यांना विविध कलात्मक गोष्टि शिकवल्या जात असत. चींगी पण मोठ्या उत्साहानं सगळ्या उपक्रमात भाग घेत होती.

बघता बघता एक महिना संपला आणि एक दिवस सुनंदा, पावनी आणि चींगील घेउन मोरे बाईंकडे गेली. योगायोगानं पावनीची शिक्षा पण चींगीबरोबरच संपत होती. सुनंदान त्यांना त्यांचे जुने कपडे घालायला दिले. कपडे घालुन झाल्यावर सुनंदा दोघींना मोरे बाईंकडे घेऊन गेल्या.  मोरे बाईंनी दोघींनाही परत असे गुन्हे करु नका असे सांगत सुधारगृहात येण्याआधी त्यांच्याकडे जेवढे पैसे होते ते दिले. दोघी बालसुधारगृहातुन बाहेर आल्या मग पावनीन चींगीला विचारल
"काय ग चींगे कु्ठं जानार तू?"
"माहिमला माझ्या आयकडे."
"चल मग मी तुला सोडते तिथे अनि मग माझ्या घरी जाते."
थोड्याचवेळत दोघी माहिमला चींगी रहात होती त्या झोपडपट्टीत पोहोचल्या. झोपडीवजा येताच चींगीला खूप आनंद झाला होता, आज बर्‍याच दिवसांनी ती तिच्या आईला आणि नाम्याला भेटणार होती. ती जेव्हा झोपडिच्या समोर आली तेव्हा झोपडिच दार नुसतच लोटल होत, तिन आत जाउन पाहिल तर झोपडी रिकामी होती, तिची आई, नाम्या, आणि त्यांच सामान काहिच दिसत नव्हत. ती झोपडीतून बाहेर आली तर समोर तिला रानी दिसली., दोघींनाही एकमेकींना पाहुन खूप आनंद झाला, रानी चींगीला म्हणाली.
"काय ग चींगे भेटला का तुझा बाप?"
"नाय, ते मला छोट्या जेलमधी घेउन गेले, माझा बाप मोठ्या जेलमधी हाये ना. अगं रानी माझी आय आनि नाम्या कुठं दिसत न्हाइत?"
"रंग्यादादानं हुसकावुन लावलं तुझ्या आयेला हप्ता दिला न्हाय म्हनून. ते दोघ कुठे गेले कोनालाच म्हाईत नाय आता आठवडा झाला त्यांना जाउन" चींगीचे डोळे एकदम भरुन अले आणि ती तशीच तिथे जोरजोरात रडू लागली. एवढावेळ शांतपणे सगळ पहात असलेली पावनी चींगीला म्हणाली.
"रड्तेस कशापायी, जाउ देत गेली तर, नाहितरी तुला मारतच होती ना. तू चल माझ्या संगे माझ्या घरी, माझी आई ठेवून घेईन तुला." असं म्हणत तिनं चींगीचा हात धरला आणि दोघी रस्ता चालु लागल्या, रानी काहिही न बोलता पाठमोर्‍या चीगीकडे नुसतीच पहात राहिली.

पुढे बरीच वर्ष अशीच निघून गेली, चींगी आणि पावनी दोघी आता मोठ्या झाल्या होत्या, वयात आल्या होत्या. पावनीच्या घरात पाहुणी म्हणून आलेली चींगी आता पावनीच्या घरच कमाईच एक साधन झाली होती. एक दिवस संध्याकाळि चींगी त्यांच्या माडिसारख्या घराच्या छतावरच्या खाटेवर पडली होती, तिला छान डोळा लागला होता. ती दचकून जागी झाली जेव्हा साधारण तीन साडेतीन वर्षाचा राजा तिला जोरजोरात हलवून उठवत होता. चीगीन त्याचे पापे घेत त्याला उचलल आणि स्वताच्या मांडीवर बसवल तसा तो तक्रारीच्या सूरात तिला म्हणाला
"आये, ती सगळी पोर मला लई चिडिवतात. मला आत्ताच सांग कि माझा बाप कोन हाये?" राजाचा हा प्रश्न चींगीच्या कानावर एखाद्या हातोड्याप्रमाणे येउन पडला.
"सांग ना माझा बाप कोन ते? तो कुठे असतो?" तेवढ्यात तिथं पावनी आली आणि ती चींगीला म्हणाली
"ए चींगे लवकर तयार हो खाली मालदार कष्टमर आल हाय. ए राजा तू चल माझ्यासंग धंद्याच्या टायमाला खोटि करु नकोस."
ती खेचतच राजाला तिथुन घेउन गेली आणि चीगी मात्र भकासपणे त्या पाठमोर्‍या जाणार्‍या राजाकडे नुसतीच बघत राहिली. 

समाप्त

४ टिप्पण्या:

 1. Mast lihile ahe apan!!! zopadpattitlya lokanchya aayushyat kharokharch ghadat aste ase!!

  उत्तर द्याहटवा
 2. अप्रतिम भाऊ!
  एकदम अप्रतिम! मानलं!

  उत्तर द्याहटवा
 3. chungi sarakha Durdaiv asanaarya baryach jani ya jagat aahet. Khara mhanaje yalaa jag kas mhanav? haa tar Nark! kaay chuk hoti tya bicharichi? Bapaachya Odhine tina chori keli aani bhalatyacha Khaturyat jauan padali.
  yala kay mhanave?
  http://savadhan.wordpress.com
  NY-USA

  उत्तर द्याहटवा
 4. mhanje koni kasha prakare adkel sangta yet nahi... awesome story... me vachlelya attaparyantchya saglya stories madhe best

  उत्तर द्याहटवा

प्रतिक्रिया नोंदवा