नभ उतरू आलं

संध्याकाळचे साधारण सात वाजले असतील, रीतु तिच्या अलिशान बंगल्याच्या बेडरूममध्ये एकटिच होती. तिशीतली रीतु दिसायला फारच सुंदर होती, साडेपाच फुट उंची, बांधेसूद शरीरयष्टी, गोरा वर्ण, लंब गोल चेहरा, आणि बोलके पिंगट टपोरे डोळे. सिल्कचा शॉर्ट कुरता, जीन्स आणि त्यावर सोडलेले मोकळे केस अशा पेहेरावात ती एकदम मोहक वाटत होती. नुकताच टिव्हीवरील एक इंग्रजी चित्रपट संपवून ती बेडरुमच्या खिडकीत उभी होती. हातात वाफाळणार्‍या कॉफिचा मग घेऊन ती बंगल्याच्या मागच पावसाळी दृष्य न्याहाळत होती. बाहेर आकाश छान दाटून आल होत, आभाळात ढगांची नुसती रेलचेल झाली होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे आधीच अंधार आणि त्यावर हे ढग, त्यामुळे काळोख अधिकच गडद भासत होता. एव्हाना पावसानं मुक्त हस्तांनी जलधारांचा शिडकाव करायला सुरुवात केली होती. पडणार्‍या पावसाच्या सरी हिरव्या गडद बागेला चिंब भिजवून टाकत होत्या. पानांमधून पावसाच्या ओळि खाली पडून अंगणातल्या पाण्यात छान वर्तुळ बनवत होत्या. हवेत एक वेगळाच तरल असा गारवा पसरला होता. पावसाच्या पाण्याचा आणि झाडांच्या मधुन घोंघावणारा वार्‍याचा आवाज वातावरण अगदी फुलवून टाकत होता. रीतुनं हळूच आपला हात खिडकीतून बाहेर काढला तसं त्या थंडगार पावसाच्या पाण्याचे थेंब तिच्या हातावर पडले आणि तिच्या सर्वांगावर शहारे आले. तिच्या अंगावर एक वेगळच रोमांच संचारल. अशा या रोमॅन्टिक वातावरणात तिला संजीवची खूप आठवण येत होती. त्याच्या मिठीत स्वतःला घट्ट गुरफटून घ्यावसं तिला वाटत होत. त्याच्या ओठावर आपले ओठ ठेवून प्रेमाच्या इंद्रधनुवर स्वार व्हावंसं वाटत होत. पाउस जसा जोर धरु लागला तशी रीतुच्या मनाची तगमग अधिकच वाढायला लागली होती.  तेवढ्यात दारावरची बेल वाजली. रीतु मनांतून खूप खुश झाली तिला वाटल संजीवच आला असावा.

रीतुनं दार उघडल तर समोर राहुल उभा होता. राहुल संजीवच्या ऑफिसमध्ये त्याचा असिस्टंट म्हणून काम करत असे. उंच, देखणा, भरदार छाती, आणि सावळा वर्ण असलेल्या राहुल ची रीतुशी चांगलीच ओळख होती. राहुलच नेहमी कामानिमित्ताने त्यांच्या घरी ये जा होत असे. रीतुला पण मनमोकळ्या स्वभावाचा राहुल मनापासून आवडत असे, अगदी थोड्याच कालावधीत दोघांची छान मैत्री पण झाली होती. तर अशा ह्या धुंद वातावरणात समोर राहुलला पाहुन रीतुच्या काळजाचा ठोका चुकला. क्षणभर ती त्याच्याकडे पहातच राहिली. मग स्वताला सावरत ती म्हणाली.
"राहुल तू?"
"मी आत येउ शकतो?" हातातली छत्री बंद करत राहुल हसतच म्हणाला.
"हो नक्किच ये ना" त्याला आत घेत रीतु म्हणाली. तिन राहुलला समोर सोफ्यावर बसण्याकरता हात केला आणि ती दार लावुन म्हणाली. .
"बस मी पाणी आणते"
"नको रीतु त्याची काहि गरज नाहिसे, तू बस"
"बर"
"अगं! मी इथे संजीवचा निरोप द्यायला आलो होतो. संजीवला आज अचानक एका मिटिंग करता मुंबईला जाव लागल त्यामुळे तो आता एकदम उद्याच येईल. आम्ही तुझा मोबाईल ट्राय करत होता पण तू फोन उचलत नव्हतीस. म्हणून मग त्यान मलाच पाठवल हा निरोप द्यायला."
"हं...नेहमीचच आहे हे. त्यात नवीन ते काय, तो आला नसता तरी मी हे समजून गेले असतेच" ती ओशाळलेल्या स्वरात म्हणाली.
"अरे आज दुपारपासून घरचा फोन डेड आहे आणि मोबाईल सायलेंट मोड वर आहे." तिच्या आवाजात खूप उदासिनता जाणवत होती..
"काय झाल रीतु तू एकदम डिस्टर्ब दिसतेय. काहि प्रॉब्लेम?" आता मात्र रीतुच संयम सुटला, तिच्या डोळ्यात पाणी तरारलं.
"काय सांगु राहुल, आमच्या लग्नाला आता तीन वर्ष झालीत, पण ह्या तीन वर्षात आम्ही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच क्षण एकत्र घालवलेत. मला हे सुद्धा आठवत नाहिसे कि तो मला शेवटच असा मनापासून कधी भेटला. त्याला फक्त आपला बिझनेस, क्लायंट्स आणि मिटिंग्स हेच प्रिय असतात. आपल्याला घर आहे आणि घरात आपली बायकोपण आहे जी आपल्या सहवासाकरता व्याकुळ असते. त्याच्या एका स्पर्शाकरता आसुसलेली असते याची जाणीवच नसते. त्याला असं वाटत कि तो मला ह्या वैभवात लोळवतोय, उच्च राहणीमान देतोय, म्हणजे सगळ झाल. अरे ह्या सगळ्या हि पेक्षा एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे एकमेकांचा सहवास. तो दिवसातला दोन मिनिट जरी असला ना तरी सुखावून जातो रे." आणि रीतुच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागलं. राहुलला क्षणभर काहिच सुचेना काय कराव ते. तो आपल्या जागेवरून उठला आणि रीतुच्या बाजुला जाउन बसला मग तिचा हात हातात घेउन तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करु लागला. .
"रीतु, शांत हो सगळ काहि ठिक होईल."
राहुलच्या हाताचा स्पर्श रीतुच्या सर्वांगावर शहारा आणून गेला. मग एकदम भानावर येत आणि आपला दुसरा हात राहुलच्या हातावर ठेवत म्हणाली
"आय एम सॉरी राहुल मी उगाचच माझं रडगाणं तुझ्या समोर गात बसले आहे." रीतुनं तिचा हात राहुलच्या हातावर हळुच दाबला, तशी राहुलच्या शरीरात एक वेगळीच लय फिरून गेली. तो आणि रीतु क्षणभर एकमेकांच्या डोळ्यात नुसतेच बघत राहिले. मग काहिशा घोगर्‍या आवाजात राहुल तिला म्हणाला.
"अस का म्हणतेस रीतु, आफ्टर ऑल वुइ आर फ्रेंन्ड्स."
तेवढ्यात बाहेरन जोरात ढगांच्या गडगडाटाचा आवाज आला. तशी रीतु दचकली आणि पटकन जाउन राहुलला बिलगली. राहुलच्या छातीचा स्पर्श रीतुला एकदम सुखावुन गेला. तिला असच त्याच्या मिठीत स्वतःला गुंतून ठेवावसं वाटत होत. ती सगळ आजूबाजूचं जग विसरली होती तिला फक्त कळत होता तो राहुल. इथे राहुलची अवस्था पण काहि वेगळी नव्हती. रीतु जेव्हा त्याला बिलगली तेव्हा क्षणभर तो गोंधळून गेला मग स्वतःला सावरत त्यानं पण रीतुला आपल्या मिठीत घट्ट आवळून घेतल. दोघंही थोडावेळ तसेच एकमेकांच्या मिठीत बसून राहिले मग रीतुन हळुवार त्याची मिठी सोडवली आणि जगाचे सगळे नीती नियम बाजुला ठेवून आपले ओठ राहुलच्या ओठावर ठेवले.

दुसर्‍या दिवशी पहाटेच राहुलला जाग आली, त्यानं हळूच रीतुच्या रेशमी मीठिमधून स्वतःला सोडवून घेतलं आणि बाजूलाच पडलेले स्वतःचे कपडे घातले. मग त्यानं रीतुच्या सुंदर गोर्‍या कायेवरुन नजर फिरवली आणि विस्कटलेल पांघरुणं नीट करुन तो तिथुन निघून गेला. सकाळी रीतुला थोडं उशीराच जाग आली, ती तशीच स्वतःला सावरत उठून बसली. तिनं आजूबाजूला पाहिल पण राहुल केव्हाच निघून गेला होता. मग आदल्या दिवशीची संध्याकाळ आठवून स्वतःशीच हसली. पण क्षणार्धात ती गंभीर झाली. तिच्या मनात एक वेगळीच अपराधी पणाची भावना जागृत व्हायला लागली होती. तिला असं वाटायला लागल होत कि कुठेतरी तिनं संजीवचा विश्वासघात केला होता  रीतुन तिचा गाऊन घालत खिडकीतून बाहेर पाहिल. बाहेर छान कोवळे उन्ह पडल होत. झाडांची हिरवीगार ओली पान सूर्याच्या प्रकाशात छान चमकत होती पण अंगणात जमा झालेला चिखल मात्र ह्या सुंदर चित्रात एके विचित्र छटा निर्माण करत होता. रीतुच्या मनाची स्थिती पण ह्याच्यापेक्षा वेगळी नव्हती रात्रीच्या त्या प्रसंगानी एकीकडे ती अगदी मोहरुन गेली होती पण दुसरी कडे संजीव बरोबरच्या विश्वासघाताची भावना तिचं मन खात होती. ती एका विचित्र द्वंद्वात सापडली होती. ती किचनमध्ये गेली आणि सकाळच्या नाश्त्याची तयारी करु लागली. दुपार पर्यंत तिच्या मनात आपण संजीवचा विश्वासघात केला हि भावना बळावत चालली होती. दुपारचे तीन वाजले असतील, रीतु घरातल्या लायब्ररीत एक पुस्तक वाचत होती  तेवढ्यात दारावरची बेल वाजली, तिनं दार उघडल तर समोर संजीव उभा होता. तो थोडा थकल्या सारखा वाटत होता  रीतुच्या हातात आपली बॅग देत तो म्हणाला.
"हाय, स्वीट हार्ट, खूप थकलोय थोडं तासभर जाउन पडतो बेडरुममधे, आणि हो मला जरा दोन दिवस दिल्लीला जाव लागेल, काहि महत्त्वाच्या मिटिंग्स आहेत. मी संध्याकाळि सहापर्यंत निघेन तोपर्यंत माझी बॅग पॅक करुन ठेव." अस म्हणत तो बेडरुममध्ये निघून गेला. रीतुनं निर्विकारपणे त्याच सगळ बोलण ऐकल आणि पुन्हा लायब्ररीत निघून गेली. साधारण पावणेसहा पर्यंत संजीव तयार होऊन डायनींग टेबलच्या खुर्चीत येऊन बसला आणि टेबलावर ठेवलेला इकोनोमिक टाइम्स चाळायला लागला. रीतुन मग नाश्त्याची प्लेट त्याच्या पुढ्यात ठेवली. नाश्ता करता करता संजीव तिला म्हणाला.
"काल रात्री खूप पाउस पडला, मुंबईमध्ये तर सगळिकडे ट्रॅफिक जाम होत." ह्यावर रीतु काहिच बोलली नाहि.
"तुला तर असा मोठा पाउस खूप आवडतो ना? मग भिजलीस कि नाहि पावसात?" ह्या प्रश्नावर रीतुची कळि एकदम खुलली.
"हो भिजले ना मनसोक्त भिजले, अगदी चिंब भिजले" पण रीतुच हे उत्तर ऐकेस्तोवर संजीव आपल्या मोबाईल फोनवर बिझी झाला होता. फोनवर बोलता बोलताच त्यान रीतुला बाय केल आणि निघून गेला आणि इथेच सकाळपासून रीतुच्या मनात सुरु असलेलं द्वंद्व संपुष्टात आले.

आज पण कालच्या सारखीच संध्याकाळ होती. आकाश काळवंडलं होत, वीजा चमकायला लागल्या होत्या, एव्हाना बाहेर पाऊस पण सुरु झाला होता. रीतु खिडकीत उभी राहुन गरम कॉफीच्या घुटक्यासोबत बाहेरच्या सौंदर्‍याचा अस्वाद घेत होती आणि कालची संध्याकाळ आठवून सुखावत होती. तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला, मोबाइलच्या डिस्प्लेवर चमकणारे नाव वाचून ती एकदम प्रफुल्लित झाली. तिनं क्षणार्धात फोन कानाला लावला अन् म्हणाली..
"हाय... राहुल..."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया नोंदवा