कंडक्टरनी "माणगाव" असं म्हणत बेल मारली, तसा शिवा तंद्रीतून बाहेर आला त्यानं झटकन आपली बॅग उचलली आणि खाली उतरला, बस झपकन धुळ उडवत निघून गेली. त्यान इकडे तिकडे बघत मस्तपैकी आळस दिला. मग अण्णाच्या वाडीची वाट चालु लागला. माणगाव तसं छोटसच होत त्यामुळे तिथे घरी पोहोचण्याकरता वाहन असं काहिच नव्हत. तो त्या सुंदर सकाळची मजा लुटत चालायला लागला, तेवढ्यात त्याला लांबून ओळखीची हाक ऐकु आली, त्यान मागे वळून पाहिल तर त्याचा बालमित्र चिंत्या आपल्या बैलगाडीत बसून त्याच्याच दिशेने येत होता. जशी बैलगाडी शिवाच्या जवळ आली चिंत्यान खाली उडी मारली आणि शिवाच्या जवळ येत म्हणाला.
"अरे शिवा तू कधी आलास?"
"हा काय आताच येतोय."
"अरे तू तर एकदम हिरो झालास रे, जीनची पॅन्ट, हा रंगीत शर्ट... वा वा."
"सोड रे झाल का तुझे परत सुरु? तू बोल कसा आहेस? आणि घरचे सगळे कसे आहेत?"
"अरे हो.. हो.. जरा दमान घे. मी एकदम बेश्ट, आनी मी बेश्ट म्हंजी घरचे बी बेश्टच कि"
मग थोडं गंभीर होत चिंत्या म्हणाला.
"पण म्हातार्यानं अंथरुण धरल बघ आता. जाऊ दे ते सारं... चल मी तुला घरी सोडतो."
"अरे नको कशाला. तुला शेतावर जायला उशीर होईन. मी जातो आपला चालत माझा."
"शेत म्हनजे काय हापिस हाये व्हय? चल बस चटकन"
त्यानं शिवाची बॅग बैलगाडीत ठेवली मग शिवा चिंत्याच्या बाजुला बसला चिंत्यान बैलगाडी हाकली, गप्पाच्या नादात आण्णाची वाडि कधी आली ते त्यांना कळलच नाहि. शिवाला लांबूनच त्याची ती लाडकि वाडि दिसली, चोहोबाजूंनी नारळ, सुपारी, आणि आंब्याची झाडं आणि मध्ये टुमदार घर. शिवाची वाट पहात आण्णा माडीवर येरझाऱ्या घालत होते. साधारण पंचाहतरीतले आण्णा अजुनहि खूप उत्साहि होते. डोक्यावरचे केस आणि ओठावरची जाड मीशी जरी पिकली असली तरी त्यांचा उत्साह मात्र एखाद्या तरूणाला लाजवेल असाच होता. शिवाला येताना पाहुन ते लगबगीनं खाली उतरले. शिवान अण्णांना वाकून नमस्कार केला तसं अण्णानी आशीर्वाद देत त्याला उठवल. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. मग शिवाला घरात नेत त्यांनी माईंना हाक मारली.
"आहो ऐकलत का? शिवा आलाय."
तसं माई म्हणजे शिवाची आजी लगबगीनं बाहेर आल्या. माई म्हणजे मूर्तीमंत मायेचं प्रतिक. वयाची सत्तरी ओलांडली तरी तिच्या चेहर्यावरच ते तेज अगदी तसंच होत. नऊवारी जरीच्या काठाची हिरवी साडी, कपाळावर मोठे कुंकू आणि डोळ्यावर चष्मा.
"अगं बाई आला का शिवा."
शिवान माईंना वाकून नमस्कार केला, तसं त्याला आशीर्वाद देत माईंनी शिवाच्या खांद्याला हात लावत उठवल. मग पदरानं आपले डोळे पुसत त्या म्हणाल्या.
"किती वाळलय गं माझ लेकरू. पुण्याला काहि खातो पितो कि नाहि रे."
"माई आता आलोय ना इथे. तुझ्या हातच खाऊन चांगला जाड जुड होऊनच जाईन."
"हट्ट शिंच्या आल्या आल्या जायच्या कसल्या गप्पा करतोस.. "
.मग वातावरणाला थोडं हलकंफुलकं करण्याकरता चिंत्या म्हणाला.
"आण्णा पाहिल का आपला शिवा कसा एकदम हिरोवानी दिसतो ते."
अण्णांनी पण चिंत्याच्या हो मध्ये हो मिळवून हसून दाखवल तस माई म्हणाल्या.
"चला आत चला. शिवा तु हात पाय धुवून घे. देवाला नमस्कार कर तोवर मी चहा आणते. चल रे चिंत्या तु पण चल".
"नाय म्या जातो आता शेतावर"
"बरं रात्री जेवायला इथेच ये भरली वांगी करणारा आहे."
"व्हय नक्किच" असं म्हणत चिंत्या निघून गेला.
पुढचा सगळा दिवस प्रवासाचा क्षीण घालवण्यात गेला, त्यान आण्णा आणि माईंशी भरपूर गप्पा मारल्या. रात्री चिंत्यापण जेवायला आला होता. माईंच्या हातच सुग्रास जेवण जेवून दोघा दोस्तांनी भरपूर गप्पा मारल्या. पुढचे दोन तीन दिवस शिवाचे असेच मजेत गेले.
रवीवारी सकाळी शिवा आणि आण्णा वाडितल्या ओसरीवर गप्पा मारत बसले होते तेवढ्यात त्यांच्या वाडित काम करणारा सदा धावतच आण्णांकडे आला. त्याचा चेहरा गंभीर वाटत होता. आण्णांनी त्याला विचारल.
"काय रे सदा काया झाल? असा का दिसतोयस तू?"
"आण्णा येक वाईट बातमी हाये. चिंत्याच्या म्हातार्यान जीव सोडला"
"अरे देवा... कधी रे"
"आताच कि थोड्या वेळापूर्वी."
शिवाकडे पहात आण्णा म्हणाले.
"चल शिवा आपल्याला जायला पाहिजे. आत जा आणि माईला घेउन ये लवकर"
तसा शिवा आत गेला, थोड्याच वेळात तिघेहि चींत्याच्या घरी रवाना झाले.
पुढील भाग लवकरच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
प्रतिक्रिया नोंदवा