पांढर्‍याची वाडी - भाग २

पूर्वसुत्र

ते जेव्हा चिंत्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या घरच वातावरण एकदम स्तब्ध होत. चिंत्याची आई टाहो फोडून रडत होती. चिंत्या एका कोपर्‍यात डोक्याला हात लावून बसला होता. शिवाला हे सगळ जरा नवीनच होत, कारण कोणाच्या अंतिम दर्शनाला जायची त्याची हि पहिलीच वेळ होती. त्याला क्षणभर काहिच सुचत नव्हत. तिघांनीही चिंत्याच्या वडिलांचं अंतिम दर्शन घेतल. मग आण्णानं शिवाला खुणेनेच चिंत्याच्या जवळ जाऊन त्याच सांत्वन करायला सांगीतल, माई चिंत्याच्या आईजवळ सांत्वनासाठी गेल्या. थोड्याच वेळात सगळे जवळचे नातेवाईक जमा झाले. गावकर्‍यांनी अण्णाच्या मदतीनं तिरडी बांधली. साधारण तासाभरात चिंत्याच्या म्हातार्‍याची अंत्ययात्रा निघाली ती गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीच्या दिशेने. तिरडीच्या पुढे चिंत्या हातात मडके धरुन चालु लागला, त्याच्या मागे नातेवाईक आणि गावातली लोक तिरडी खांद्यावर उचलून आणि राम नामाचा गजर करत चालु लागले. शिवान पण तिरडीला आपला खांदा दिला होता, अण्णा शिवाच्या बाजूनेच चालत होते. सार वातावरणच एकदम विचित्र वाटत होत, आकाश ढगाळ झाल होत त्यामुळे सगळीकडे एक वेगळिच औदासीन्याची कळा दाटून आली होती. हळूहळू अंत्ययात्रा गावातला मुख्य रस्ता सोडून गावाच्या बाहेर जाणार्‍या कच्या रस्त्याला लागली. थोड्याच वेळात अंत्ययात्रा एका वाडीच्या समोर येऊन थांबली. अत्यंत जुनाट आणि रुक्ष अशी दिसणारी ती वाडी खूपच भकास वाटत होती. शिवान लहानपणापासून ह्या वाडी बद्दल ऐकल होत पण तिथे जायची कधीच हिंमत केली नव्हती.  चिंत्यान आपल्या हातांतले मडकं जमिनीवर ठेवल,  मग कोणीतरी त्याच्या हातात एक जीवंत कोंबडी आणि सुरा दिला. चिंत्या वाडीच्या दिशेने तोंड करुन उभा राहिला आणि म्हणाला.
"पांढर्‍या हा घे तुझा प्रसाद आनी माझ्या बाला सोडुन दे"
मग चिंत्यान त्या धारधार सुर्‍यान त्या कोंबडीचं नरड फाडल, तशी ती कोंबडी जिवाच्या आकांतानं ओरडत तडफडायला लागली. चिंत्यान कोणताही विचार न करता तिला वाडीच्या आत फेकून दिली. आणि ती अंत्ययात्रा पुढच्या प्रवासाला निघाली. हा सगळा प्रकार पाहुन शिवाच डोक एकदम सुन्न झाल. चिंत्याच हे असं एका जीवाला मारुन टाकण हे त्याला अगदीच अनाकलनीय होत. त्याच्या डोळ्यांसमोरून तो मगाचचा तो प्रसंग काहि जात नव्हता.

चिंत्याच्या म्हातार्‍याचे अंतिम संस्कार आटोपून शिवा आणि अण्णा दुपारपर्यंत घरी आले. अंघोळ वगैरे आटोपून दोघं जेवायला बसले. माईन आज एकदम साधाच स्वयंपाक केला होत. जेवायला सुरुवात झाली तरी शिवाच लक्ष जेवणात नव्हतच, त्याच्या डोळ्यासमोर दिसत होती ती पांढर्‍याची ती वाडी आणि तो मगाचचा प्रसंग. तेवढ्यात अण्णांनी त्याला हटकल.
"काय रे शिवा कुठे ध्यान आहे तुझं? अरे माई तुला कधी पासूनची चपाती वाढु का ते विचारतेय."
अण्णांचा दमदार आवाज ऐकुन शिवा एकदम तंद्रीतून जागा झाला.
"काहि नाहि अण्णा, असच"
"अरे शिवा जो माणूस जल्माला आला तो कधीतरी जाणारच त्याचा अपल्या मनाला एवढा त्रास करुन नाहि घ्यायचा."
"तसं नाहि अण्णा."
"मग रे?"
"अण्णा, मी लहानपणापासून ती पांढर्‍याची वाडी पाहतो आहे. तिथे कोणीच जात नाहित. आज तिथे चिंत्यान जो कोंबडीचा बळी दिला त्याबद्दल मी नुसतच ऐकल होत पण पाहिल कधीच नव्हत. काय आहे तरी काय असं त्या वाडीत? तिथं असा कोणी गेल्यावर बळी का देतात?"
"अरे हा कसला खुळा विचार घेऊन बसलायस डोक्यात. जेव गुपचुप"
शिवा गुपचुप मान खाली घालुन जेवु लागला, पण त्याच्या मनात विचारांच नुसतं वादळ उठलं होत.

संध्याकाळि माई घराच्या मागच्या बाजुला धान्य पाखडत बसली होती. शिवा पण माईच्या बाजुला येउन बसला, माईन मोठ्या मायेन त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि परत आपल्या कामाला लागली.
"माई, मला एक सांगशील? त्या पांढर्‍याच्या वाडीत असं काय आहे कि कोण मेल कि तिथं जनावराचा बळी देतात?"
"अरे शिवा हे काय खुळ तू दुपारपासून घेऊन बसलायस? काहि नाहि रे गावची प्रथा एवढच"
"नाहि माई आज तुला हे मला सांगावच लागेल लहानपणी पण जेव्हा मी हा प्रश्न विचारला तेव्हा मला म्हणायची मोठा झाल्यावर तुला कळेल."
मग माईनी परत शिवाच्या पाठीवरून हात फिरवत त्याला म्हणाली.
"काहि नाहि रे गावची प्रथा एवढच"
"पण एका निष्पाप जीवाचा बळी घ्यायचा हि कसली प्रथा?"
"अरे बाळा असं बोलु नये, पांढर्‍या खूप भयंकर आहे."
"म्हणजे नक्की काय आहे तरी काय तिथं"
"अरे ती खूप जुनी म्हणजे शे चारशे,वर्ष जुनी पांढरे कुटुंबाची शापित वाडी आहे. असं म्हणतात कि ती खूप मोठी वाडी आहे ती. त्या काळात ह्या गावात पांढरे कुटुंबाचा खूप दबदबा होता, पण काळ सरला आणि सार्‍या कुटुंबाची रया झाली. पुढे म्हणतात त्याचा एकच वारसदार उरला तो म्हणजे रावसाहेब पांढरे त्याचच भूत त्या वाडीत भटकत आहे असं म्हणतात."
"भूत?"
"होय, भूत आणि असं म्हणतात जेव्हा कुणी मरतो तेव्हा पांढर्‍यानं त्याच्या आत्म्याला त्रास देऊ नये म्हणून एखाद्या जनावराचा बळी देतात. म्हणजे पांढर्‍या त्या मेलेल्या च्या आत्म्याला सोडून देतो. अरे देवा मी हे तुला काय सांगत बसले."
"छे! माई माझा ह्या सगळ्यावर अजिबात विश्वास नाहि, मी भूत वगैरे ह्या गोष्टि मानत नाहि. भूत, प्रेत, मंत्र, तंत्र हे सगळे थोतांड आहे."
"शिवा, हे सगळ खर असत. भूत प्रेत मंत्र तंत्र सगळ खर असत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलय आणि स्वता अनुभवलय हे सगळ. तेव्हा तू ह्या सगळ्यापासून दूरच रहा"
मागून अण्णा त्यांच्या करड्या आवाजात म्हणाले, तसं चमकून त्या दोघांनी मागे पाहिल.
"आता हा विचार डोक्यातून काढून टाक आणि माझ्याबरोबर चल जरा माळावर जाऊन येऊ."

दुसर्‍या दिवशी संध्याकाळ उलटून गेली होती. अण्णा आणि माई अंगणातल्या झोपाळ्यावर बसले होते. दोघाही थोडे चिंतेत दिसत होते
"काय ग कुठे गेलाय हा शिवा आजून आला नाहि तो?"
"मगाच मला म्हणाला कि थोडं पाय मोकळे करुन येतो, म्हटलं जा. घरी बसून पण कंटाळत लेकरू, पण इतका वेळ लागेल असं नव्हता बोलला."
तेवढ्यात समोरून सदा धावत येताना दिसला, त्याच्या चेहर्‍यावर भीती दिसत होती.
"अण्णा... अण्णा... धाकले धनी...."
"अरे काय झालं शिवाला? आणि तू असा घाबरला का आहेस?"
"अण्णा, तो समशानातला शिरपा सांगत होता त्यान धाकले धनीना पांढर्‍याच्या वाडित जाताना पहिलं. "
"काय.... कधी?"
"तो म्हनाला दोन एक तासापूर्वी"
"आणि तू हे आता सांगतोयस होय... च लवकर"
अण्णा झटकन झोपाळ्यावरुन उतरले आणि तेवढ्यात.....

पुढील भाग लवकरच...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया नोंदवा