पांढर्‍याची वाडी - भाग ३

 पूर्वसुत्र

शिवाच्या डोक्यातून पांढर्‍याची वाडी काहि केल्या जायला तयार नव्हती, रात्रभर तो नुसताच त्या वाडीचा विचार करत होता. ’खरच तिथं भुतं वगैरे असेल का? नक्की आहे तरी काय तिथं?’ एक ना हजार प्रश्न त्याला सतावत होते. शेवटि उद्या पांढर्‍याच्या वाडीत जायचच असं जेव्हा ठरवल तेव्हा कुठे त्याचा डोळा लागला. सोमवारी दुपारी तो पाय मोकळे करुन येतो असं सांगून बाहेर पडला आणि त्यान थेट पांढर्‍याच्या वाडीचा रस्ता पकडला. त्यान गाव सोडल आणि गावाबाहेरून जाणार्‍या अरुंद रस्त्याला लागला. जशी त्याला पांढर्‍याची वाडी दूरूनच दिसायला लागली त्याच्या मनांत एक वेगळीच उत्कंठा जागरुत व्हायला लागली होती. वाडी कसली आहो ते तर जंगलच होत, संपूर्ण वाडी उंचच उंच झाडांनी नुसती वेढून गेली होती त्यामुळे आंतला काहि दिसण्याचा मार्गच नव्हता. वाडीच्या भोवती भक्कम दगडि विटांचे कुंपण होत. बाह्य भागावरून असं वाटत होत कि वाडीच्या मागच्या बाजुला लांबच लांब जंगल पसरलेल असाव. वाडीत प्रवेश करण्याकरता दर्शनी भागात जे प्रवेशद्वार होत ते एकच, म्हणजे जर मागून एखाद प्रवेशद्वार असेल तर ते कोणालाच माहिती नव्हत. समोरच प्रवेशद्वार पण एकदम जुनं झाले होत. प्रवेशद्वाराच्या बाजुच्या खांबावर काहीतरी लिहिल होत पण ते वाचण्याच्या स्थितीत नव्हत. गर्द झाडीमुळे वाडीच्या वातावरणात एक वेगळीच गुढता आली होती.

जशी वाडी जवळ येऊ लागली तशी शिवाच्या ‍ह्रदयाची धडधड वाढु लागली. समोर दिसणारी ती भकास वाडी, तिच्या भोवती असलेल ते निरस असं गुढ वातावरण शिवाच्या मनाला भेदून जात होतं. शिवा हळुवार चालत वाडीच्या मुख्य दरवाजाशी आला. दरवाजाच्या फटीतून त्यान आत वाकून पाहिल, आत त्याला काहिच दिसले नाहि, दिसली ती फक्त अस्ताव्यस्त वाढलेली झाड आणि कुरणासारख वाढलेल गवत. पण त्याला एका गोष्टीच मात्र आश्चर्य वाटल मुख्य दरवाजा पासून थोड्याच अंतरावर एक पायवाट आतल्या बाजुने जात होती. त्यान मनाचा निर्धार करत मुख्य दरवाजा उघडण्या करता थोडा ढकलला, तसा दरवाजा एकदम कर.... असा आवाज करत उघडला. शिवान आजूबाजूला बघत वाडीत प्रवेश केला आणि दरवाजातच उभं राहुन चोहोबाजूंना नजर फिरवली. त्याच्या अंदाजाप्रमाणे ती वाडी खूपच मोठी होती. दरवाजाच्या उजव्या बाजुला विस्तीर्ण गवताचं पठार जे गर्द रानटी झाडांनी वेढले गेले होत  शिवाची नजर भिरभिरत डाव्या बाजुला गेली तर तिथं असंख्य मेलेल्या कोंबड्यांची नुसतीच हाड पडली होती.  भीतीची एक वेगळीच शीरशीरी शिवाच्या तळ पायापासून मस्तकापर्यंत गेली, क्षणभर त्याच्या मनात विचार आला कि परत फिराव पण दुसर्‍याच क्षणाला त्यान आत जाण्याकरता परत मनाचा निर्धार केला. त्यान अस्ताव्यस्त वाढलेल्या त्या गवतावर पाउल ठेवल आणि तो हळूहळू त्या पायवाटेच्या दिशेने चालु लागला. ती पायवाट गर्द वाढलेल्या झाडितुन आतल्या बाजुला जात होती. पायवाटेवरुन चालत थोड पुढे गेल्यावर त्याला आतल्या बाजुला झाडिंच्या वेलीतुन एक कौलारू दुमजली घर दिसल.

तो तसाच पुढे चालत राहिला, त्यान जेव्हा वेलींची ती गर्द कमान पार केली तेव्हा त्याला ते दुमजली घर अगदी स्पष्ट दिसू लागल. दगडि बांधकामाचं ते घर खूप मोठं असावं, काहि ठिकाणी घराची पडझड झाली असली तरी घर बर्‍यापैकि सुस्थितीत वाटत होत. घरासमोर मोठं अंगण होत. मुख्य दरवाजाच्या समोर एक मोडकळीला आलेल तुळशी वृंदावन होत, त्यात कुठलीतरी वेगळीच रानटी झाड वाढली होती. घराच्या चोहोबाजूंना जवळ जवळ गुडघाभर गवत वाढलेलं होत. घर दुमजली होत म्हणजे तळ मजल आणि त्यावर अजुन एक मजला. घराच मुख्य दार पण खूपच जुनाट वाटत होत. ते नुसतच कडी लावून बंद केल होत, काहि ठिकाणि दाराला भोक पण पडली होती. मुख्य दाराच्या अगदी समोर एक ओसरी होती ज्यावर आता गवत उगवलं होत. दरवाजाच्या बाजुला दोन खिडक्या होत्या, त्यांचे दरवाजेच तुटले होते. त्यातुन घरातल अंधारी भितीदायक दृष्य दिसत होत. वरच्या मजल्यावर जाण्याकरता बहुतेक आतूनच रस्ता असावा. वरच्या मजल्याच्या खोल्यांना खिडक्या होत्या पण त्या अत्यंत मोडकळीला आल्या होत्या. हे सगळ पाहुन शिवाला खूपच भीती वाटायला लागली, त्याला चांगलाच घाम दरदरून फुटला होता..

संपूर्ण घराच जवळून निरीक्षण करत तो घराच्या थोडं मागच्या बाजुला गेला, तिथं त्याला हौदासारख काहीतरी दिसल. म्हणून तो थोडं अजुन पुढे गेला आणि समोरच ते दृष्य आश्चर्यानं डोळे विस्फारून पहातच राहिला


पुढील भाग लवकरच...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया नोंदवा