पांढर्‍याची वाडी

 पूर्वसुत्र

समोरचा हौद साधारण वीस फुट लांब आणि तीस फुट रुंद असेल. हौदाला चोहोबाजूंना पायर्‍या होत्या ज्या अगदी मोडकळीस आल्या होत्या. हौदात बर्‍यापैकि पाणी होत त्यावर बरच शेवाळ साचलेल होत. साचलेलं शेवाळ आणि झाडांची पडलेली हिरवी पानं ह्यामुळे पाण्याचा रंग सुद्धा हिरवा वाटत होता. परंतु ह्या सगळ्यात शिवाला ज्या गोष्टीमुळे आश्चर्याचा धक्का बसला ती म्हणजे हौदाच्या उजव्या बाजुला पायर्‍यांवर एक सुंदर तरुणी आपले पाय हिरव्या गर्द पाण्यात सोडून बसली होती. ती काहीतरी गाणं गुणगुणत हातातला स्वेटर विणत बसली होती, ऐकायला ते गाणं काहीतरी वेगळच वाटत असल तरी खूप मधुर होतं. ती स्वतःच्याच तंद्रीत होती त्यामुळे तिला शिवाच्या अस्तित्वाची जाणीवदेखील झाली नव्हती. ती तरुणी दिसायला खूपच देखणी होती. गोरा वर्ण, लांबट चेहरा, त्यावर रेखीव घारे डोळे, गुलाबाच्या पाकळी सारखे नाजूक ओठ, आणि चाफेकळी सारख नाजूक नाक. तिनं जरीचे काठ असलेलं लाल रंगाचं परकर आणि पोलक घातल होत. तिने आपले छान मऊ केस पाठिवर मोकळे सोडले होते, जे वायावर भूरभूरत तिच्या चेहयावर येत होते पण तिला त्याची काहिच पर्वा नव्हती. ती आपल्याच नादात होती. शिवा आपली शुद्ध हरपुन तिच्या त्या आरस्पानी सौंदर्याकडे पहातच राहिला होता.

तेवढ्यात त्या तरूणीच लक्ष शिवाकडे गेलं तशी ती क्षणार्धात उठून उभी राहिली आणि हौदाच्या बाजुला असलेल्या एका मोठ्या झाडामागे जाऊन लपली. शिवा धावत त्या झाडाच्या दिशेने जाऊ लागला तशी ती जोरत ओरडली.
"थांब तिथेच... जवळ यायचा प्रयत्न करु नकोस, परिणाम खूप वाईट होतील."
तिचा तो मंजुळ पण दरडावणारा आवाज ऐकुन शिवा जागीच थबकला.
"घाबरू नकोस मी तुला काहि नाहि करणार. मी शिवा, बाहेर गावात राहतो."
ती हळूच बाहेर आली, जवळून तर ती अधिकच सुंदर वाटत होती.
"इथं काय करतोयस?"
"सहजच आतमध्ये डोकावून पहायला आलो."
"सहजच! तुला भीती नाहि वाटली? तुला ठाऊक आहे ना कि इथं भूत असतात म्हणून."
तसा शिवा हसला आणि म्हणाला.
"माझा भूतांवर विश्वास नाहि. आणि मला अजूनतरी इथं तसं काहि दिसल नाहि. पण तू इथे अशा भकास जागी अशी एकटीच काय करतेस?"
"त्याच्याशी तुला काय कर्तव्य? तू निघ आता इथून."
पण शिवान तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता परत तिला विचारल.
"तू इथं एकटीच राहतेस...? तुझं नाव काय?"
ती काहिच बोलली नाहि नुसतच शिवाकडे रोखून बघत राहिली. आणि शिवाच्या पुढच्या हालचालींचा अंदाज घेऊ लागली.
"घाबरु नकोस मी खरच काहि करणार नाहि तुला. मी अण्णा फडणीसांचा नातू शिवा. माझं लहानपण ह्याच गावात गेलं. लहानपणापासून इथे यायची इच्छा होती पण कोणी येऊच दिलं नाहि. आज हिंम्मत करुन इथं आलोय"
हे सगळ ऐकुन तिला थोडा धीर आल्यासारखा वाटला.
"मी, सुमी इथेच राहते."
"इथे?... आणि एकटि?"
"होय..."
"तुला भीती नाहि वाटत?"
"कसली?"
"भूतांची?"
"हं.... बाहेरच्या जगातली जी माणसं आहेत ना त्यांच्यापेक्षा इथली भूत बरी."
"म्हणजे इथं भूत आहेत?"
"तू आता घरी जा, संध्याकाळ व्हायला लागली आहे..."
शिवान मनगटातल्या घड्याळात पाहिल तर संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. त्यान तिच्याकडे परत एकदा पाहिल, ती निर्विकारपणे नुसतीच बघत उभी होती.
"मी उद्या परत येईल सकाळीच."
तिनं त्याला काहिच उत्तर दिलं नाहि, फक्त त्याच्याकडे भकासपणे पाहिलं आणि मग घराच्या दिशेने चालायला लागली. शिवा तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात राहिला. झाडांवर पक्षांचा किलबिलाट पण वाढायला लागला होता, शिवा पायवाटेनं परत मागे फिरला आणि त्या गर्द वेलींच्या कमानी जवळ आला. त्यान सहजच मागे वळून पाहिल, त्याला घराच्या तळमजल्यावर एक अंधुकसा प्रकाश दिसला. शिवा स्वतःशीच हसला आणि परतीच्या वाटेला लागला. संपूर्ण वाटेत त्याच्या डोळ्यासमोरून ती तरुणी काहि जात नव्ह्ती. विचारांच्या तंद्रीत घर कधी आल हे पण त्याला कळल नाहि. घरी आला तेव्हा अण्णा, माई आणि गावचे काहि लोक त्याचीच वाट पहात बसले होते.

मंगळवारी शिवा सकाळी लवकरच उठला आणि पांढर्‍याच्या वाडीच्या दिशेने चालु लागला. जसा तो वाडीच्या जवळ आला तशी त्याच्या मनात एक प्रकारची वेगळीच उत्सुकता वाढायला लागली होती. तो वाडीचा मुख्य दरवाजा उघडून आत गेला. सकाळची वेळ असली तरी आकाश ढगाळ होत, अपुरा सूर्यप्रकाश आणि त्यातुन गर्द झाडि ह्यामुळे वाडीत तसा अंधारच वाटत होता. तो पायवाटेने चालत सरळ त्या वेलींच्या गर्द कमानीतुन आत गेला. घराच दार आता सुद्धा बंदच होत. त्यान आजूबाजूला पाहिल पण सुमी कुठेच दिसली नाहि मग त्यान थोडं पुढे जाउन घराच्या बाजुला असलेला हौदाच्या दिशेने पाहिल पण तिथं सुद्धा सुमी नव्हती. त्याची नजर भिरभिरत तिला चोहोबाजूंना शोधु लागली. तेवढ्यात त्याला मागून तिचा आवाज आला.
"तू?... तू परत आलास?"
शिवा त्या शांत वातावरणात अचानक आलेल्या त्या आवाजानं एकदम दचकला. त्यान झपकन मागे वळून पाहिल तर त्याच्यापासून थोड्याच अंतरावर सुमी उभी होती. आज तिने निळ्या रंगाच नक्षीदार परकर पोलक घातल होत. आज तर ती अधिकच सुंदर दिसत होती. शिवा तिच्या त्या आरस्पानी सौंदर्याकडे पहातच राहिला, तसं तिने त्याला परत विचारल.
"तू इथं परत का आलास?"
तसा शिवा भानावर येत म्हणाला.
"मी काल म्हटल होत ना, मी उद्या येईन म्हणून."
ती नुसतीच त्याच्याकडे पाहुन हसली.
"तू चांगल्या घरातला दिसतोयस, तुझ्यासारख्याला इथे येण बरं नाहि."
"का असं का म्हंटतेस तू?"
"ह्या गावात सगळ्यात अभद्र गोष्ट कोणती मानतात ठाऊक आहे? हि वाडी. इथे कोणी यायचे सोडाच पण चुकून पहायची पण हिंमत करत नाहित,"
"मग तू कशी आलीस इथं"
ती काहिच बोलली नाहि आणि घराच्या दिशेने चालु लागली. शिवापण मोहिनी पडावी तसा तिच्या मागे चालु लागला. घराच्या जवळ आल्यावर तिने निर्विकारपणे दरवाजा ढकलला आणि ती आतमध्ये गेली. तिच्यामागे शिवा पण घरात शिरला. आतमध्ये जाताच समोर बैठकीची खोली होती. तिथे अगदी जीर्ण अवस्थेत असलेल्या चार पाच लाकडी खुर्च्या ओळीने मांडून ठेवल्या होत्या. बाजूलाच एक झोपाळा लावला होता त्याच्या कड्या अगदी गंजून गेल्या होत्या. बैठकीची खोली तशी ऐसपैस होती. झोपाळ्याच्या अगदी बाजुला एक लाकडी जिना होता जो सरळ वरच्या मजल्यावर जात होता. जिन्याच्या बाजुला आतल्या घरात जाण्याकरता दरवाजा होता. सुमीनं शिवाकडे पहात त्याला खुर्चीवर बसायची खूण केली, आणि ती आत निघून गेली. शिवाची नजर त्या खोलीत चोहोबाजूंनी फिरली. भिंतीवरचा मातीचा थर निघून गेल्यामुळे जागोजागी आतली दगड दिसत होती. जिन्याच्या बरोबर समोरच्या भीतीवर बरीच तैलचित्र लावली होती. तो त्या तैलचित्रांच्या जवळ गेला आणि ती न्याहाळु लागला.

पुढील भाग लवकरच...

४ टिप्पण्या:

प्रतिक्रिया नोंदवा