पांढर्‍याची वाडी - शेवटचा भाग

पूर्वसुत्र

भिंतीवर अगदी जुन्या झालेल्या चार मोठया तैलचित्रांच्या तसबिरी होत्या. त्यात तीन पुरुष आणि एक स्त्री यांचा समावेश होता. तसबिरींची स्थिती खूपच वाईट होती.काहि ठिकाणी तर त्या तुटल्याहि होत्या. आतल्या तैलचित्रांची अवस्था पण ह्यापेक्षा वेगळी नव्हती. काहि ठिकाणी त्या फाटलेल्या होत्या, तर जागोजागी त्यांचा रंग उडाला होता. शिवा ती चित्र न्याहाळत असताना मागून सुमी त्याला म्हणाली.
"पाणी?"
त्यान वळून पाहिल तर सुमी पितळ्याच्या पेल्यात पाणी घेऊन उभी होती. त्यान तिच्याकडून पाण्याचं भांड घेत तिला विचारल.
"हि चित्र खूप जुनी दिसतात तुमच्या पूर्वजांची आहेत का?"
"माहिती नाहि."
"म्हणजे?"
"माझा ह्या घराशी काहिहि संबंध नाहि."
"संबंध नाहि... म्हणजे? मग तू इथं कशी आलीस?"
"मी इथं स्वतःचा जीव वाचवत आले. माझ्या आई बापाला मारुन त्यानी माझ्यावर हात टाकायचा प्रयत्न केला."
तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती.
"कोणी?"
"माझ्या मामान?"
"तुझ्या आई बाबांना मारलं? पण का?"
तिनं त्याला काहिच उत्तर दिलं नाहि. ती शांतपणे खिडकीजवळ गेली आणि बाहेर पाहु लागली. शिवा तिच्या जवळ गेला तसं ती खिडकीतून बाहेर बघतच त्याला म्हणाली.
"किती वाईट लोक आहेत ह्या जगात. हे जग नुसतं गिधाडांनी भरलेल आहे एखाद जर एकट जनावर दिसल तरी सगळे तुटून पडतात त्याच्यावर".
तिचे डोळे पाणावले होते तिचा आवाज भरुन आला होता. मग ती परत शिवाकडे पहात म्हणाली.
"खर सांगु इतक्या दिवसानंतर कोणाशी तरी असं मोकळेपणानी बोलून खूप छान वाटल. तू खूप चांगला माणूस दिसतोयस"
"कशावरून" शिवा थोडं मिश्कीलपणे हसत म्हणाला.
"एवढि माणसांची जाण आहे मला, नाहि तर मी तुला इथवर येऊच दिलं नसतं." असं म्हणत ती परत घराच्या बाहेर गेली. शिवाला तिचं हे शेवटच वाक्य थोडं विचित्र वाटल. शिवा तिच्या मागे बाहेर आला. मग दोघे चालतच हौदा पर्यंत गेले. चलता चालता सुमीन शिवाला विचारल.
"तुझ्या घरी कोण असत?"
"माझ्या घरी माझे अण्णा, माई, आणि मी असे तिघचं असतो...."
दोघेही गप्पा मारत हौदापर्यत आले. हळूहळू दोघांच्याही गप्पा रंगत गेल्या. गप्पांच्या नादात कधी संध्याकाळ झाली ते कळलही नाहि. शिवावर सुमीची एवढि मोहिनी पडली होती कि तो आपली तहान, भूक पण विसरुन गेला होता. संध्याकाळी जसा पक्षांचा किलकिलाट सुरु झाला तशी सुमी त्याला म्हणाला.
"तू आता निघायला पाहिजेस."
"जायची तर अजिबात इच्छा नाहि पण जाव तर लागेलच. ..उद्या सकाळी परत येईन."
तिनं त्याला काहिच उत्तर दिलं नाहि, फक्त त्याला छान गोड असं एक स्मित हास्य दिलं आणि ती घराच्या दिशेने चालु लागली. शिवानपण वाडी बाहेर जायचा रस्ता पकडला. तो त्या गर्द वेलींच्या कमानी जवळ आला, त्यान सहजच मागे वळून पाहिल, तर त्याला घराच्या तळमजल्यावर एक अंधूकसा प्रकाश दिसला.

मंगळवारची सगळी रात्र सुमीची स्वप्न पाहण्यातच गेली. बुधवारी सकाळी लवकरच उठून तो पांढर्‍याच्या वाडीत गेला, घराचा दरवाजा उघडाच होता. त्यान आत प्रवेश केला तर सुमी बैठकीच्या खोलीतल्या झोपाळ्यावर लोकर विणत बसली होती. तिनं शिवाला पाहिल आणि तिचं ते गोड स्मित दिलं.
"हे काय करतेस?"
शिवान खुर्चीवर बसत तिला विचारल.
"लोकरीचा सदरा विणतेय"
तिनं निर्विकारपणे उत्तर दिलं.
"कोणा करता?"
"तुझ्या करता."
आज सुमी कालच्या पेक्षा जरा वेगळीच वाटत होती.
"माझ्याकरता.. आणि एवढ्या लवकर तू इतका स्वेटर विणलास पण.?"
सुमीनं नेहमीप्रमाणेच त्याच्या प्रश्नाला काहिच उत्तर दिलं नाहि, नुसतच त्याला स्मित दिलं. मग त्याला म्हणाली.
"जरा इथे माझ्या जवळ बस ना मला माप घ्यायच आहे."
शिवा काहिहि न बोलता शांतपणे तिच्या जवळ जाउन बसला. तिनं लोकरीच्या धाग्याने त्याच माप घ्यायला सुरुवात केली. तिच्या हाताचा तो मधुर मुलायम स्पर्श शिवाच्या सर्वांगावर शहारा आणून गेला. तो नुसताच तिच्याकडे पहात बसला होता. तिनं माप घेऊन परत स्वेटर विणायला सुरुवात केली. आता मात्र शिवाच्या मनाची चलबिचल वाढत चालली होती, त्यान शेवटी न रहावून स्वतःचा हात तिच्या हातावर ठेवला, तसं तिनं त्याच्याकडे पाहिल. तिच्या चेहेऱ्यावर खूप सुंदर पण गुढ असं हास्य होत, शिवा तिला म्हणाला.
"सुमी गेले दोन दिवस मला तुझ्याशिवाय काहिच सुचत नाहिये. सगळीकडे फक्त तूच दिसतेस, तू अशी माझ्यावर काय जादू केलीस कि मी मलाच विसरुन गेलो आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करायला लागलो आहे."
मग सुमीपण तिचा दुसरा हात त्याच्या हातावर ठेवत म्हणाली.
"शिवा माझी अवस्था पण ह्यापेक्षा वेगळी नाहिये रे, पण आपण असं काहिच करु शकत नाहि. तू परत जा तुझ्या जगात माझ्याकडे तुला देण्यासारखं काहिच नाहि. तू मला विसरुन जा."
तिचे डोळे पाणावले होते.
"आता ते शक्य नाहि सुमी, माझं जग तूच आहेस, आणि तुझ्यापेक्षा मला ह्या जगात दुसरी कुठलीच गोष्ट महत्वाची नाहि."
"खरच?"
असे म्हणत तिनं त्याला मिठी मारली, शिवान पण तिला आपल्या मिठीत घट्ट आवळून घेतल. पुढचा सगळा दिवस ते असेच एकमेकांच्या प्रेमात बुडून गेले होते. तो संपूर्ण दिवस दोघांनी एकमेकांच्या सहवासात खूप सुंदर क्षण घालवले.

संध्याकाळ झाली तरी शिवाला घरी परत जायचे भानच उरलं नव्हत, अण्णा, माई, गाव एवढच काय पण तो जेवण खाण सगळ सगळ पूर्णपणे विसरुन गेला होता. त्याला काहिच कळत नव्हत, त्याला कळत होती ती फक्त सुमी. जशी रात्र चढू लागली तसं सुमी त्याला घेउन माडीवरच्या खोलीत आली, त्या रात्री त्या दोघांनी एकमेकांवर प्रेमाचा मुक्त वर्षाव केला. गुरुवारी सकाळी जेव्हा सिवाला जाग आली तेव्हा तो माडीवरच्या त्या खोलीत एकटाच झोपला होता, त्यान आजूबाजूला पाहिल तर सुमी तिथं नव्हती. तो जीना उतरुन खाली आला. समोर सुमी बैठकीची झाडत होती, त्याला बघून तिनं ते तिचं नेहमीच गोड स्मित हास्य दिलं. तो तिच्या जवळ गेला आणि मान खाली घालुन तिला म्हणाला.
"सुमी काल रात्री जे काहि झाल त्याबद्दल मला माफ कर माझा संयम पूर्णपणे सुटला होता."
"असं नको म्हणुस..."
"नाहि तू काहिच बोलू नकोस एक विचारु तू माझ्याशी लग्न करशील?"
सुमीनं त्याला काहिच उत्तर दिलं नाहि, ती नुसतीच शांतपणे त्याच्याकडे पहात राहिली.
"चल आपण आताच लग्न करु. मला खात्री आहे अण्णा आणि माई माझ्या इच्छे विरुद्ध जाणार नाहित."
"शिवा माझे जरा ऐकुन तर घे..."
पण शिवा काहिच ऐकण्याच्या तयारीत नव्हता. त्यान तिचा हात पकडला आणि तिला घराबाहेर घेउन आला. दोघेही चालत मुख्य दरवाजाजवळ आले. ते मुख्य दरवाजातून बाहेर येणार तेवढ्यात त्यांना समोरून एक अंत्ययात्रा येताना दिसली. ते दोघे तसेच तिथे दरवाजातच उभे राहिले. समोरच दृष्य पाहुन शिवाला प्रचंड मोठा धक्का बसला. अंत्ययात्रेच्या पुढे हातात दोरीला टांगलेल मडकं घेऊन अण्णा चालत होते, रडून त्यांचे डोळे लाल झाले होते, त्यांच्यामागे चिंत्या आणि गावातले इतर लोक आपल्या खांद्यावर तिरडी घेऊन येत होते. शिवानं सुमीकडे पाहिल, त्याला काहिच कळत नव्हत हे काय चालल आहे. पण त्याला सगळ्यात मोठा धक्का बसला जेव्हा त्यान स्वतःचाच मृतदेह त्या तिरडीवर पाहिला, तो क्षणभर एकदम गोंधळून गेला, त्यान दरवाजातून बाहेर यायचा प्रयत्न केला पण कुठलीतरी एक अदृष्य शक्ति त्याला रोखून धरत होती. त्यान जीवाच्या आकांतानं अण्णांना हाका मारायला सुरुवात केली पण त्यांच्यापर्यंत त्याचा आवाजच पोहोचत नव्हता, त्याच्याकडे कोणीच पहात नव्हत. प्रथेप्रमाणे ती यात्रा वाडी समोर येऊन थांबली. आण्णांनी कोंबडीचा बळी द्यावयाच्या विधीला सुरुवात केली. तेवढ्य़ात वाडीच्या जवळच उभा असलेला सदाची बाजुच्या एका  माणसाबरोबर चललेली काहीतरी कुजबुज त्याच्या कानावर पडली, सदा सांगत होता.
"चांगला तरुन पोरगा गेला हो अन्नांचा. ह्या म्हातारवयात त्याला हेच पहायच होत. आवो तो ह्याच वाडीत गेला होता सोमवारी, रात्री घरी आला ते तापान फनफनला व्हता. गेले दोन दिवस त्याला सुधच नवती. अन्नांनी मांत्रीक, तांत्रीक, अंगारे, धुपारे सर्व करुन पायल बघा पन पोरगा काहि उठेना. मंग काल रात्री तालुक्याच्या डाक्टरला बोलावल, रात्रभर डाक्टरन उपाय केले पन आज पाहाटे पोरान सगळ्यांना निरोप दिला बघा. नशीब असत एकेकाच." शिवान ते बोलण ऐकल आणि त्याच्या पायाखालची जमिनीचं जणू सरकली. प्रथेप्रमाणे अण्णांनी कोंबडीचा बळी दिला आणि ती यात्रा स्मशानभूमीच्या दिशेने निघाली.
शिवाच डोक एकदम सुन्न झाल होत, तेवढ्यात त्याला जाणीव झाली कि इतका वेळ त्याच्या हातात हात असलेल्या सुमीच्या हाताचा स्पर्श धुसर होत चालला होता. त्यान झटकन तिच्याकडे पाहिल तशी ती त्याच्यापासून दूर गेली आणि त्याला म्हणाली.
"शिवा तुझ्यामुळे माझ्या आत्म्याला आज मुक्ति मिळाली. त्या रावसाहेबाच्या प्रेमात पडून गेली शंभर वर्ष मी ह्या शापित वाडीत अडकून पडले होते. आता तू पण इथे असाच अडकून राहशील जोपर्यंत कोणी येऊन तुझ्या आत्म्याला मुक्ति देत नाहि."
असं म्हणत ती हळूहळू धुळ होऊन वातावरणात विरुन गेली आणि शिवा नुसताच अगतिकपणे एकदा तिच्याकडे आणि एकदा समोर जात असलेल्या स्वतःच्याच अंत्ययात्रेकडे पहात राहिला..

समाप्त

२ टिप्पण्या:

प्रतिक्रिया नोंदवा