फक्त तुझीच - भाग १

मॉलच्या पार्किंग लॉट मध्ये कार पार्क करत जतिन घाईतच आत शिरला. समोरच्या पारदर्शक लिफ्टमध्ये चढून तो चवथ्या मजल्यावरच्या खेळण्यांच्या दुकानात शिरला. तिथुन त्यान एक छान मोठा टेडि विकत घेतला. मग बील पे करण्यासाठी काऊंटरवर आला, तेवढ्यात त्याचा मोबाईल फोन वाजला. एकिकडे फोन कानाला लावत त्यान काऊंटरवर बिलं पे करायला कार्ड दिलं. समोरन नीता बोलत होती.
"अरे कुठे आहेस? साडेसात वाजलेत, पाहुणे पण यायला सुरुवात झाली आहेत आता."
"अगं... हो....हो... पोहोचतोच आहे दहा मिनिटात."
"आणि हो येताना मॉन्जीनिजमधुन केक कलेक्ट करायला विसरू नकोस."
"हो आहे लक्षात माझ्या... श्रेयु तयार झाली?"
"हो केव्हाच तिचे सगळे फ्रेण्ड्स पण आलेत."
"बर पोचलोच"
जतिनन कार्डच्या पावतीवर सहि केली, आणि सुंदर अशा कागदात गिफ्टव्रॅप केलेला टेडि घेउन बाहेर आला. मग बाजूलाच असलेल्या केक शॉपमध्ये गेला आणि आधीपासूनच बुक केलेला केक घेऊन बाहेर आला. आता एका हातात केकचा बॉक्स आणि दुसऱ्या हातात तो मोठा टेडि अशी कसरत करत तो लिफ्टच्या समोर जाऊन उभा राहिला, थोड्याच वेळात लिफ्ट पण आली. लिफ्टच दार ऊघडलं आणि जतिनच लक्ष लिफ्टमधून बाहेर येणाऱ्या त्या व्यक्तीकडे गेलं तसे त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद असे दोन्ही भाव एकदम एकवटून आले. त्याच्यासमोर सोनल उभी होती. सोनलपण जतिनकडे आश्चर्यानं बघत राहिली आणि नकळत तिनं आपले दोन्ही हात स्वताच्य तोंडावर ठेवले आणि ती आनंदानं जतिनकडे पहात हसू लागली. ती मोठ्या उत्साहात जतिनला म्हणाली.
"जतिन, तू... तू कसा इथे?"
"सोनल हे तर मी तुला विचारायला हव. तू इथे कशी?"
"आले तुला भेटायला"
आणि दोघं हसू लागले.
"कशी आहेस"
"मजेत, आणि तू कसा आहेस?"
"खूप मजेत. तू अमेरीकेहून आलीस तरी कधी?"
"झाला आता एखादा महिना, आता इथेच सेटल व्हायचा विचार आहे."
"वा छान."
"पण तू हे सगळ सामान घेऊन चालला कुठे आहेस?"
"घरी, अरे बापरे खूपच उशीर झालाय, चल मला निघायला हव"
असं म्हणत तो लिफ्टच्या दिशेने चालु लागला.
"अरे तुझा फोन नंबर तर दे."
"९८७६२३२३२३"
"मी तुला फोन करीन"
"नक्कीच, मी तुझ्या फोनची वाट पाहिल"
लिफ्टमध्ये शिरता शिरता जतिन तिला म्हणाला. जशी लिफ्ट ह्ळुहळु खाली उतरू लागली सोनल स्वतःशीच हसली आणि रेलिंगच्या खाली उतरणाऱ्या जतिनकडे नुसतीच पहात राहिली.

श्रेयुची बर्थ डे पार्टि खूपच छान झाली. जतिन आणि नीतान पाहुण्यांची सरबराई करण्यात कुठेही कसर सोडली नव्हती. रात्री दोघाही इतके थकले होते कि बिछान्यात पडल्या पडल्या दोघांचा कधी डोळा लागला ते कळलच नाहि. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आवरून जतिन गाडीत बसला. गाडी स्टार्ट केली आणि ऑफिसच्या रस्ताला लागला तसं त्याला जाणवलं कि काल संध्याकाळपासून कदाचित तो पहिल्यांदाच एवढा रीलॅक्स होता. विचारांच्या नादात त्याला काल संध्याकाळचा तो मॉल मधला प्रसंग आठवला. "सोनल.." तो स्वतःशीच पुटपुटला आणि त्याच्या शरीरातून एक वेगळीच लहर येऊन गेली. त्याच्या मनात विचारांच्या लहरी वाहु लागल्या. ’किती छान दिसत होती ती, निळ्या रंगाची जीन्स आणि त्यावर पांढरा टॉप. गोल चेहरा, घारे डोळे, गोरा रंग आणि थोडसं नकटं नाक आणि वाऱ्यावर भुरभुरणारे तिचे ते सुंदर मऊ मोकळे केस. खरच अजूनही तेवढीच सुंदर दिसत होती ती.’ तो स्वतःशीच हसला. विचारांच्या तंद्रीत तो ऑफिसच्या पार्किंग लॉटमध्ये कधी शिरला ते त्यालाच कळल नाहि. ऑफिसमध्ये जाऊन तो आपल्या रोजच्या कामाला लागला, पण तरीही त्याच्या डोक्यातून सोनल काहि केल्या जात नव्हती. त्याच्या जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा जागृत होत होत्या. तेवढ्यात त्याचा मोबाईल फोन वाजला, डिस्प्ले वर कुठलातरी वेगळाच नंबर होता त्यानं फोन कानाला लावला.
"हॅलो"
"हॅलो, इज धिस जतिन?"
"होय जतिनच.... सोनल?"
"बरोबर... माझा आवाज ओळखला तर?"
"म्हणजे काय असा कसा विसरेन, पण तू विसरलीस"
"नाहि रे फक्त खात्री करून घ्यायला आधी नाव विचारल."
आणि दोघंही हसू लागले.
"बरं तू आहेस तरी कुठे आता?"
"ऑफिसमध्ये"
"अरे म्हणजे कुठल्या एरीयात... अजूनही तसाच आहेस... डंबो."
"मी मेकर्स चेंबर्स अंधेरीला, आणि तू"
"अरे वा मी पण तुझ्याच बाजुच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे पार्वती टॉवर्स मध्ये आहे"
"क्या बात है..."
"दुपारी काय करतोयस? काहि महत्त्वाच्या अपॉईंटमेंट्स?"
"नाहि काहि खास असं काहि नाहि."
"ओके मग लेट्स गो फॉर लंच?"
"लंच?"
"कारे काहि प्रॉब्लेम आहे का?"
"नाहि ग तस काहि नाहि... चालेल भेटु आपण"
"ठिक आहे मग दिड वाजता मला मधुमालतिला भेट, चायनिज मस्त मिळत तिथं"
"नक्कीच... तू अजूनही तशीच आहेस क्षणार्धात निर्णय घेणारी"
मग ती नुसतीच हसली आणि तिनं फोन डिस्कनेक्ट केला. जतिननं तिचा फोन नंबर सेव्ह करण्याकरता फोन बुक उघडल, आणि क्षणभर तो भूतकाळात गेला. कॉलेजमध्ये असताना सोनलकडे फोन आधीपासूनच होता, पण जेव्हा जतिननं नवीन फोन घेतला तेव्हा सोनलन हट्टान सगळ्यात पहिला नंबर तिचा सेव्ह केला होता आणि तोही "माय स्वीटी" ह्या नावानं, जतिन स्वतःशीच हसला, मग त्यान "सोनल एम" ह्या नावानं तिचा नंबर सेव्ह केला आणि मोबाईल डेस्कवर ठेऊन कामाला लागला.

दुपारी बरोबर एक वाजून पंचवीस मिनिटांनी त्याचा फोन वाजला, समोर सोनलच होती.
"हं... साहेब लक्षात आहे ना?"
"होय तर... निघतच होतो."
त्यानं फोन डिस्कनेक्ट केला आणि लिफ्टच्या दिशेने पळाला, मग चालतच गेटमधून बाहेर आला. रेस्टॉरंट अगदी जवळच होत त्यामुळे गाडी काढायचा काहिच प्रश्न नव्हता. सोनल आधीच रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसली होती, तिचं सगळ लक्ष मुख्य दरवाजाकडे लागलं होतं. तेवढ्यात तिनं जतिनला आतमध्ये येताना पाहिल, जतिननं पण लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्यानं तिला लांबूनच हात केला तसं तिनं त्याला गोड असं स्मित दिलं. त्याच्याकडे बघून तिच्या मनात विचार चमकून गेले, ’अजूनही हा तसाच आहे, उंच, गोरा आणि त्यावर ते स्वप्नील काळे डोळे, भरदार छाती, आता थोडं पोट पुढे आलेलं दिसतय पण तसाच स्मार्ट दिसतोय.’ तेवढ्यात जतिन टेबलाजवळ आला आणि खुर्चीवर बसत म्हणाला.
"काय गं... एवढा कसला विचार करत होतोस"
"काहि नाहि रे खूप दिवसांनी तुला अगदी डोळे भरुन बघत होते."
"बापरे.. असं काय पहात होतोस माझ्यात?"
"बघत होते तो पूर्वीचा जतिन आणि हा जतिन ह्यांच्यात किती बदल झाला आहे ते."
"अरे... वा मला पण जाणून घ्यायला आवडेल कि काय बदल झालाय ते?"
"विशेष काहि नाहि, डोक्यावरचे काहि केस पिकलेत आणि हे पोट थोडं पुढे आलेलं दिसतय बाकि तसाच आहेस."
आणि ते दोघं खळखळून हसायला लागले.
"आता बोल कसा आहेस?"
"मजेत..."
"आणि तू?"
"मी पण छान आहे."
"तू पण अगदी आहेस तशी आहेस एकही इंच पुढे नाहि कि मागे नाहि."
"मग मेंटेन ठेवलय स्वतःला मी"
आणि दोघं पुन्हा हसू लागले.
"जतिन... अरे तुझं लग्न झाल असं कळल होत. कशी आहे रे तुझी बायको? काय नाव तिचं?"
"नीता... आणि माझी बायको म्हंटल्यावर छानच असणार ना."
"हो... का... बरं..."
"आम्हाला एक चार वर्षाची मुलगी पण आहे श्रेया"
"वा छान, तू तर एकदम संसारी माणूस झालायस म्हणजे"
"हो अगदी पूर्णपणे."
आणि दोघं खळखळून हसू लागले, मग थोडं गंभीर होत सोनल म्हणाली.
"हो... खरच आहे ते आयुष्यात व्यवस्थित सेटल होण खूप महत्त्वाचं असतं."
तेवढ्यात वेटर ऑर्डर घ्यायला आला.
"बोल काय खाणार? इथं चायनिज खूप छान मिळत"
"तुला जे आवडतं ते ऑर्डर कर"
"तू पण ना..."
असं म्हणत तिनं ऑर्डर दिली वेटर निघून गेला आणि त्यांच्या गप्पा परत सुरु झाल्या.
"आता हे तर झाल माझ्याबद्दल, तू सांग तुझं कस चाललंय? तुझी अमेरिकावारी कशी होती? आणि हो तुझं एमएस पूर्ण झाल कि नाहि?"
"हो माझं एमएस पूर्ण झाल आणि तेही डिस्टिंक्शन मध्ये. पुढे तिथेच आठ वर्ष काम केलं, मग कंटाळा आला इकडची ओढ वाढायला लागली आणि आले सगळ गुंडाळून. बघु दोन चार वर्ष इथे राहुन नाहि पटल तर बॅक टु युएस."
"वा छान, अभिनंदन तू एमएस झाल्याबद्दल"
"थँक्यू"
"हे तर झाल करीयर बद्दल, आणि लग्न वगैरे?"
"लग्न हो झाल होत ना तिकडच्याच एका माणसाबरोबर, स्टीफन नाव होत त्याच"
"क्या बात है म्हणजे लव्ह मॅरेज... पण ’झाल होत’ म्हणजे"
"म्हणजे आता आय एम सिंगल अगेन"
"’डिवोर्स?’ पण का? पटत नव्हत का?"
"तसंच काहिसं म्हणता येईल, खरं सांगु माझ्या दृष्टिने ते लग्न नव्हतच झटपट ग्रीन कार्ड मिळवण्याकरता केलेल ते एक कॉन्ट्रॅक्ट होत."
"आणि त्याच्या दृष्टिने?"
"काय माहिती कदाचित प्रेम किंवा फक्त ऍट्रॅक्शन !!! आणि तुला माहितच आहे आयुष्यात मी पहिलं आणि शेवटच अगदी मनापासून प्रेम केल ते तुझ्यावर"
"मग सोडून का गेलीस?" 
जतिनच्या ह्या प्रश्नानं वातावरण एकदम गंभीर झालं होत. एखाद्या जुन्या जखमेवर हात लागल्यावर ज्या वेदना होतात तसे भाव दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होते. मग सोनलच जरा आजूबाजूला पहात म्हणाली.
"अरे आपण दहा वर्षांनी भेटलो आणि ह्या काय जुन्या गोष्टि घेऊन बसलोय."
तेवढ्यात वेटर पण लंच घेऊन आला. मग नूडल्सचा एक घास खात ती म्हणाली.
"वाव... व्हॉट अ टेस्ट यार... अमेरीकेत अशी टेस्ट मिळत नाहि. काय रे तुझी बायको कसा स्वयंपाक करते?"
"तूच तर म्हणालीस ना मघाशी, पोट सुटलंय म्हणून मग समजून जा"
आणि दोघं पुन्हा हसू लागले. दोघंही गप्पांच्या ओघात थेट आपल्या कॉलेजच्या जमान्यात जाऊन पोचले. बिल पे करून दोघं हॉटेलमधून बाहेर आले, क्षणभर थांबून सोनल म्हणाली.
"बऱ्याच वर्षांनी तुला भेटून आज खूप छान वाटल."
"हो ना आज इतक्या वर्षांनंतर मलाही खरच खूप छान वाटल"
"मग आता परत कधी भेटणार?"
"असच कधीतरी"

पुढील भाग लवकरच..
.

1 टिप्पणी:

प्रतिक्रिया नोंदवा