तो क्षण - भाग - १

दिनेशला जाऊन आज चौदा दिवस झाले होते, स्मिता बाल्कनीतल्या रॉकिंग चेअरवर डोळे मिटुन शांतपणे पुढे मागे झोके घेत बसली होती. बर्‍याच दिवसांनी तिला असं शांत वाटत होत. मागच्या काहि दिवसांपासून चालु असलेलं दिनेशच आजारपण आणि त्यातूनच चौदा दिवसांपूर्वी झालेलं त्याच दुःखद निधन. ह्या सगळ्या काळात स्मिता खूपच मानसिक आणि शारीरिक ओढाताणीतून गेली होती. दिनेशचे शेवटचे दिवस तर फारच कठीण होते. केवळ पन्नाशीतच त्याला तोंडाच्या कर्क रोगानं ग्रासलं होत, जेव्हा हा आजार लक्षात आला तेव्हा खूपच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तर फक्त एक महिना असंच सांगितलं होत आणि त्यातच तो हृदयाच्या विकाराने पण त्रस्त होता. कर्करोगामुळे त्याला बोलताही येत नव्हत आणि खाण, पिणं तर पूर्णपणे बंद होत अशात आधार होता तो फक्त ग्लुकोजचा. जसे दिवस जवळ येत चालले होते तशी त्याची अवस्था फारच दयनीय होत चालली होती. ह्या काळात स्मिताचे चोवीस तासातले चौदा ते पंधरा तास हॉस्पिटल मध्येच जात आणि बाकीचा वेळ शरीराला आवश्यक असणारी थोडीफार झोप आणि घरातल काम ह्यातच जात असे, त्यामुळे तिचं स्वतःकडे असं खूपच दुर्लक्ष झाल होत. अर्थात कुशाल होताच मदतीला तरीही एक पत्नी म्हणुन तिच्या जबाबदार्‍या वेगळ्याच होत्या. कुशालला जेव्हा आपल्या वडिलांच्या आजाराबद्दल कळल तेव्हा तो एक महिन्याची सुट्टी मंजूर करून अमेरिकेवरून आला होता. पण ह्या सगळ्या काळात खरी मदत केली ती सिमरनन. अजून तिच कुशालशी लग्न पण झाल नव्हत तरीही ती त्या दोघांचं एखाद्या सख्या मुलीप्रमाणे करत होती, जेव्हा कुशाल अमेरिकेत होता अणि दिनेशची तब्येत खूपच बिघडली तेव्हा स्मितानं पहिली मदतीची हाक मारली ती सिमरनलाच. दुसर्‍या भाषेची, धर्माची असूनही ती सदैव त्यांच्याबरोबर राहिली होती.
 
गेले चौदा दिवस घरात सतत नातेवाईक, मित्रपरिवार ह्यांचा राबता होता त्यामुळे स्मिताला स्वतःकरता असा वेळच मिळाला नव्हता. पण आज जेव्हा ती शांतपणे बसली होती तेव्हा तिच्या डोळ्यासमोरून तिचे आणि दिनेशच्या संसाराचे ते सुखाचे क्षण एखाद्या चित्रपटाप्रमाणे जात होते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षिच तिनं आपल्या आईवडिलांनी ठरवून दिलेल्या मुलाचा हात पकडून ह्या घरात प्रवेश केला तो अगदी त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत घट्ट पकडायला. लग्नानंतर बरेच वर्ष दोघांनाही मुलं बाळ नव्हत त्यामुळे त्यांना बर्‍याच मानसिक ताण तणावातून जाव लागल होत. लग्नापासून ते दिनेशच्या आजारापर्यंतचे सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे जात होते, आणि तिला तो शेवटचा प्रसंग आठवला तसं तिच्या अंगावर सर्रकन काटा आला.

कुशालचा जेव्हा जन्म झाला तेव्हा दिनेशचा आनंद गगनात मावत नव्हता, तो कुशालवर आपला जीव ओवाळून टाकत असे. त्याचं हसण, रडण, खेळण, बोलण, धावण, त्याचा हट्ट अगदी सगळ सगळ मनापासून एन्जॉय करत होता. पुढे जसा कुशाल मोठा होत गेला तसं त्यांचं ते बाप लेकाच नातं दोन मित्रांच्या नात्यात बदलत गेलं. कुशाल शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागला आणि कामानिमित्ताने अमेरिकेला गेला तो तिकडचाच बनून राहिला. सगळ कसं अगदी छान सुखात चालल होत पण तरीही असं काहि तरी होत जे स्मिताला ह्या सगळ्या सुखाचा मनापासून आनंद घ्यायला परावृत्त करीत होतं. एक सत्य जे तिनं दिनेशपासून आयुष्यभर लपवून ठेवलं होतं आणि ज्यामुळे तिच्या सुखी संसाराची पूर्णपणे धूळधाण होण्यास वेळ लागणार नव्हता. ती बर्‍याच वेळा मनाचा निश्चय करायची कि आज दिनेशला सगळं सांगायच पण कधी हिंमतच झाली नव्हती. इतके दिवस झाले होते तरी स्मिताच्या मनातली ती तळमळ कायम होती.

जेव्हा डॉक्टरांनी स्मिताला दिनेशच्या आजाराबद्दल सांगितलं तेव्हा ती पार कोसळून गेली, त्यातच तिला कळल त्यांच्याकडे फक्त एकच महिना आहे. तिची खूप इच्छा होती कि दिनेश असेपर्यंत कुशाल आणि सिमरनच लग्न होऊन जाव पण डॉक्टरांनी दिनेशला एवढा ताण सहन होणार नाहि असं सांगीतलं. त्यामुळे तिनं कुशाल भारतात आल्यावर दोघांचा दिनेशच्या समोर हॉस्पिटलमध्येच साखरपुडा केला. दिनेशला खूप आनंद झाला होता. दिवसेंदिवस दिनेशची प्रकृती खूपच खालावत चालली होती. आता स्मितापुढे मोठा पेच निर्माण झाला होता, आयुष्यभर जे सत्य आपण दिनेशपासून लपवून ठेवल ते त्याला सांगायच का त्याला तसच जाऊ द्यायच. जर तिनं ते सत्य त्याला नसतच सांगीतलं तर तिला आयुष्यभर तिच मन खात राहिलं असतं, पण जर तिनं ते दिनेशला सांगितलं तर त्याची काय प्रतिक्रिया असेल याचा ती विचारही करु शकत नव्हती. पुढचे वीस दिवस ती अशीच द्विधा मन स्थितीत दिनेश समोर बसलेली असे.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया नोंदवा