निर्णय

बाहेर छान रीप रीप पाऊस पडत होता. निसर्गानं एव्हाना आपला हिरवागार गालिचा सभोवताली पसरला होता. सगळा आसमंत पक्षांच्या सूरावटीवर एकदम मंत्रमुग्ध झाला होता. हिरव्यागार पानावरून पाण्याचे थेंब जणु जमिनीवरच्या पाण्यात सूर मारत होते. रंगीबेरंगी फुलांचा साज चढवून झाडे जणू त्या वरूणराजाचं मुक्त हस्ताने स्वागत करत होती. सगळ वातावरण एकदम मोहरुन टाकणारं होतं. निला बेडरुम लगतच्या बाल्कनीत उभी राहुन एकटक समोरच्या त्या तळ्या कडे पहात होती. एका हातात वाफाळणारी कॉफी तर दुसर्‍या हाताची बोट अव्याहतपणे गॅलरीच्या रेलिंगवर वळवळ करत होती. ती कुठल्यातरी प्रचंड मानसिक तणावाखाली वाटत होती. तिनं कॉफीचा कप टेबलवर ठेवला आणि मागे वळुन पहिलं, संजीव नेहमीप्रमाणे बेडवर शांत झोपला होता. गेले दहा वर्ष तो असाच झोपला होता. त्याच्या शरीराचा एकही अवयव हलत नव्हता फक्त ह्रदयाची धडधड तेवढी चालु होती. बाकि सगळच शांत. निलाला त्याचा तो कोरा करकरीत चेहरा का कुणास ठाऊक पण खूप निरागस वाटत असे. गेल्या दहा वर्षात तिच त्याच्याशी विलक्षण असं एक वेगळच नात जोडलं गेलं होत.

दहा वर्षापूर्वी हे असं नव्हत. सांगली सारख्या छोट्या शहरात वाढलेली निला आपल्या आई वडलांची एकुलती एक मुलगी. एकत्र कुटुंबात रहात असल्यानं तिच्यावर आपसूकच पारंपारिक विचारांचा बडगा होता. निलानं नुकतच पदवीच शिक्षण पूर्ण केलं होतं आणि पुढिल शिक्षणाचे तिला वेध लागले होते. तेवढ्यात मुंबईच्या डॉ. प्रधानांच्या एकुलत्या एका मुलाच स्थळ चालुन आलं. मुलाचे आईवडिल व्यवसायानं डॉक्टर होते. मुलगा पण नुकताच डॉक्टर झाला होता आणि एका नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होता. घरात कशाचीच कमतरता नव्हती  मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचा स्वतःचाच प्रशस्त बंगला होता. घरात सगळ्या कामांना नोकर चाकर आणि घराच्या बाहेर गाडि अशी सगळि सुबत्ता नांदत होती. एवढ सगळ असल्यावर अशा स्थळाला घरच्या मंडळींनी नाहि म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. निला पण आपल्या घरच्यांच्या निर्णयाविरुद्ध नव्हती. मुख्य म्हणजे लग्नानंतर सुद्धा शिकायला तिच्या सासरकडुन प्रोत्साहनच होत. सगळ कसं अगदी जुळून आलं होत.

डॉ. संजीव प्रधान निलाचा भावी पती. संजीव स्वभावानं एकदम शांत होता म्हणजे निला जितकि अवखळ, हसरी, बोलकी तितकाच तो शांत होता. पहिल्या भेटीतच त्यान निलाला पसंत केल होत आणि आणि निलानीसुध्दा त्याला मनोमन स्वीकारलं होतं. बघण्याचा कार्यक्रम झाला आणि लगेच दुसर्‍या दिवशी त्यांचा साखरपुडाही उरकला. प्रधानांना लग्नाची थोडि घाई होती कारण संजीवला एका ट्रेनिंग करता तीन महिने लंडनला जाव लागणार होत. त्यामुळे लग्न अवघ्या महिन्याभरातच पार पडलं. आधी ठरल्याप्रमाणे निला संजीव बरोबर लंडनला जाणार होती पण काहि तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झाल नाहि. लग्न होऊन निला मुंबईत सासरी आली. तिच तिथे सगळ्यानी खूपच छान स्वागत केलं. निला जरी बोलक्या स्वभावाची असली तरी नवीन घर, नवीन माणसं, नवीन जागा, आणि नवीन शहर ह्या सगळ्यात एकदम बावरुनच गेली होती. पण ह्या सगळ्यात संजीव आणि निलाच्या सासूबाईंनी तिला खूप आधार दिला. पुढे चार पाच दिवसातच संजीवला लंडनला जाव लागल. संजीवच्या आई वडिलांनी पुढचे तीन महिने निलानं तिच्या माहेरी रहाव का सासरी याचा निर्णय तिलाच घ्यायला सांगितला. पण निलाच्या दृष्टिने निर्णय घ्यायची गरजच नव्हती आता तेच तिच घर होत त्यामुळे ते सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. प्रधान दांपत्याला निलाच्य ह्या निर्णयाचं खूप कौतुक वाटल. निलाच्या सासूबाई म्हणजे डॉ. मालती प्रधान तिला खूप प्रेमानं वागवत म्हणजे अगदी आपल्या मुलींप्रमाणे जपत. व्यवसायानं मानसोपचार तद्दन असलेल्या मालती बाई एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होतं. संजीव लंडनला गेल्यावर त्यांनी निलाला एम. बी. ए. ला ऍडमिशन घ्यायला प्रोत्साहित केलं. लवकरच कॉलेज सुरु झाल आणि निला एकदम बिझी झाली. संजीव बरोबर रोज नसल्या तरी आठवड्यातून तीन चार वेळा तरी फोनवरून गप्पा होत असत. दोघांनाही एकमेकांना समजुन घ्यायला तेच एक साधन होत. दिवस सरत होते संजीव लंडनला जाउन आता अडिच महिने झाले होते. दोघांनाही एकमेकांना भेटण्याचे खूप वेध लागले होते. पण अचानक त्यानं निलाला अजुन तीन महिने तरी इथेच रहाव लागेल असं कळवलं. निला थोडि हिरमुसली म्हणजे अजुन तीन महिने.

ती शुक्रवारची सकाळ होती निला कॉलेजला जायची तयारी करत होती तेवढ्यात घरातला फोन वाजला, समोरून कोणा अनोळखी व्यक्तिचा आवाज होता.
"संजीव प्रधानांच घर का?"
"हो! आपण कोण?"
"मी सुषमा, लीलावती हॉस्पिटलमधून बोलते आहे. मला संजीव प्रधानांच्या जवळच्या कोणाशी तरी बोलायचे आहे?"
"मी त्यांची पत्नी, काय झाल?"
"संजीवना इथे आता थोड्याच वेळापूर्वी ऍडमिट केलं आहे. त्यांचा ऍक्सीडंट झाला आहे. तुम्ही ताबडतोब इथे या."
निला क्षणभर सुन्न झाली संजीवचा ऍक्सिडेंट पण तो तर लंडन.... तो मुंबईत कसा?
"आहो काय बोलत आहात तुम्ही? मला असं वाटतय तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. संजीव तर लंडनला आहेत."
"मॅडम आज पहाटे एअरपोर्ट वरुन येताना ते बसलेल्या टॅक्सीचा ऍक्सीडंट झाला. ड्रायव्हर जागीच मरण पावला पण सुदैवानं संजीव ठिक आहेत. तुम्ही ताबडतोब निघुन या."
निला तो फोन हातात घेऊन तशीच एकदम खाली बसली तेवढ्यात मालती बाई आल्या. निला प्रथम नुसतच त्यांच्याकडे पहात राहिली मग त्यांनी तिला थोड हलवले तेव्हा तिनं झाल्या प्रकाराविषयी सगळ सांगितलं. मालतीबाईंनी लगेच लीलावती हॉस्पिटलमध्ये फोन लावला आणि बातमीची खातरजमा करून घेतली. संजीवचे वडिल एका मेडिकल कॉन्फरन्स करता दिल्लीत होते. मग दोघी लगेच गाडि काढुन लीलावतीला गेल्या. गाडितुन त्यांनी संजीवच्या वडिलांना या घटनेविषयी सांगितल. त्या दोघी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या तेव्हा संजीव आय.सी.यु. मध्ये ऍडमिट होता. त्याच्या डोक्याला बराच मार लागला होता. मालती बाईंनी लगेच डॉक्टरांची भेट घेतली तेव्हा डॉक्टरांनी एक अत्यंत वाईट बातमी दिली, संजीव कोमात गेला होता.

त्या दिवसापासून निलाच आयुष्यच बदलुन गेले होत. थोड्याच दिवसात संजीवला घरी आणल गेले. पुढचे जवळ जवळ दोन ते तीन महिने निला संजीवची काळजी घेत होती. संजीवच्या शारीरिक जखमा बर्‍या झाल्या होत्या पण तो नुसताच निपचित बिछान्यावर पडुन होता. प्रधान दांपत्यानं संजीवची केस अगदी निष्णात डॉक्टरांबरोबर डिस्कस केली पण कोणीच सांगु शकत नव्हत कि संजीव कोमातुन बाहेर कधी येईल. खर तर त्याला लंडनवरून अचानक घरी येऊन सगळ्यानाच सरप्राईज द्यायच होत पण दैवानंच सगळ्यांना अस विचित्र सरप्राईज दिलं होत. आता संजीवची काळजी घ्यायला एक पूर्णवेळ नर्स ठेवली होती. निलान आपल शिक्षण परत सुरु केलं दिवसभर निला आपल्या अभ्यासात व्यस्त असे. ती आपला आभ्यास सांभाळून संजीवची काळजी घेत असे. तिचा दिवस कसा जाई तिलाच कळत नसे पण रात्र तिला जणु खायला ऊठत असे. ती एकटिच त्याच्याशी गप्पा मारत असे. त्याला दिवसभर काय झाल ते सांगत असे. प्रेमानं त्याला कुरवाळत असे. तिला माहिती नव्हत ती जे बोलतेय ती जे वागतेय ह्यातल काहि तरी त्याच्या पर्यंत पोहोचत तरी का.

दिवस वेगाने जात होते. संजीव कोमात जाऊन आता दोन वर्ष झाली होती. निलाच शिक्षण पूर्ण झाल होतं. आता ती एका मोठ्या सॉफ्टवेअर फर्ममध्ये जॉब करू लागली तेही फक्त मालतीबाईंच्या आग्रहास्तव. त्यांचा एकच उद्देश होता तिच मन कुठे तरी रमलं पाहिजे. नवीन जॉब, नवीन माणस ह्यात निला हळुहळु बर्‍यापैकि स्वताच दुख विसारायला लागली होती ती पूर्वी पेक्षाहि जास्त व्यस्त झाली होती. ऑफिसमध्ये निलाची प्रतिमा एक शांत मुलगी म्हणुनच होती. कोणालाच तिच्या आयुष्यातल्या घटनांबद्दल माहिती नव्हती किंबहुना तिनं तेवढि कोणाशी जवळिकच केली नव्ह्ती.

संजीवला कोमात जाउन आता पाच वर्ष झाली होती. सगळ्यांनी संजीव आता परत बरा होईल याची आशा सोडून दिली होती पण निलाला मात्र अजुनहि वाटत होत कि संजीव बरा होईल. एका रविवारी गप्पांच्या ओघात मालतीबाईनी बर्‍याच दिवसापासून निलाशी ज्या विषयावर चर्चा करायची होती त्या विषयाला हात घातला.

"निला, आज पाच वर्ष झाली संजीव मध्ये काहिच सुधारणा नाहि. आपण चांगल्यातले चांगले न्यूरॉलॉजिस्ट कन्सल्ट केलं पण कोणीच काहिहि करु शकल नाहि. डॉक्टरांच्या मते अशा केसमध्ये पेशंट आयुष्यभर पण कोमात राहु शकतो आणि कोमातच..."
त्यांचा आवाज घशातच अडकला आणि डोळे एकदम भरुन आले.
"आहो, आई असं काय बोलतात अचानक तुम्ही. माझ मन सांगतय संजीव नक्कीच बरा होईल. तुम्ही काहि काळजी करु नका."
"नाहि गं पोरी मला त्याची आता काळजी नाहि वाटत त्याला जेव्हा बरा व्हायचाय तेव्हा तो बरा होईल पण मला तुझी खूप काळजी वाटते. असं किती वर्ष तू आपल आयुष्य एकटीने काढणार आहेस? तू तरूण आहेस, तुझ्याही काहि भावना असतील. उभ आयुष्य अस एकट काढण सोपं नसत. कोणाची तरी साथ असाविच लागते."
"आहे ना मला तुमची, बाबांची, आणि संजीवची साथ आहे ना."
"आम्ही तर सदैव तुझ्याबरोबरच आहोत ग पण... मी कालच माझ्या एका वकिल मित्राशी ह्या विषयी चर्चा केली. संजीव तुझ्याशी संसार करण्यास अनफिट आहे असं दाखवून तुला घटस्फोट मिळु शकतो. तू दुसरे लग्न कर."
आणि त्या एकदम रडायला लागल्या. तस निलान त्यांचा हात आपल्या हातात घट्ट धरला तिला पण आता रडु आवरत नव्हत. मग त्यांच्या डोळ्यातले अश्रु पुसत ती म्हणाली.
"मी ह्यातल काहिहि करणार नाहिये. मी तुम्हा सगळ्यांना सोडून कुठेहि जाणार नाहिये. हेच माझ घर आहे."
हे सगळ लांबुन ऐकत असलेल्या तिच्या सासर्‍यांच्या डोळ्यात पण एव्हाना पाणी तरळलं होत.

निला तिच्या ऑफिसमध्ये कामात अत्यंत हुशार होती त्यामुळे थोड्याच कालावधीतच ती सगळ्यांची लाडकि झाली होती. संजीव कोमात जाऊन आता आठ वर्ष झाली होती. निलाच आयुष्य तिच्या बेडरूम लगतच्या बाल्कनीतून दिसणार्‍या शांत तळ्याप्रमाणे झालं होत. एखादि वार्‍याची झुळूक आली कि हळुवार तरंग ऊठत कि परत सगळ शांत. पण हे फार काळ टिकणार नव्हत नियतीला काहि वेगळच अपेक्षित होत. शांत तळ्यात जर एखादा अवखळ वार्‍याचा झंजावात घुसल्यावर तळ्याची जी अवस्था झाली असती तशीच अवस्था निलाच्या आयुष्याची परत एकदा होणार होती. निलाच्या ह्या शांत आयुष्यात एखाद्या झांजावतासारखा घुसणारा होता तिचा नवीन मॅनेजर रोहित. रोहित म्हणजे फुल्ल ऑफ एनर्जी. तो निलाला समवयस्क होता. दिसायला देखणा रुबाबदार रोहित निलाकडे अगदी सहज आकर्षित झाला. त्याला निलाच्या आयुष्यातील घटनांबद्दल विशेष माहिती नव्हती. प्रथम निला त्याच्याशी कामापुरतेच बोलत असे. पण हळुवार त्यांच्यातली मैत्री वाढत गेली. निलाच्या त्या निष्पर्ण आयुष्य रुपी वेलीवर जणू नवीन पालवी फुटायला लागली होती. रोहितची कंपनी तिला आवडायला लागली होती. निलातला हा बदल मालतिबाईंच्या पण लक्षात आला होता. त्या मनोमन खूप सुखावल्या. निला रात्री झोपताना नेहमीप्रमाणे संजीवला सगळ सांगत असे अगदी रोहित विषयी सुद्धा. निलान रोहितला तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची कल्पना दिली. रोहितला तिचा तो उमदा स्वभाव खूपच भावला होता. प्राप्त परिस्थितीला ती ज्या धैर्याने तोंड देते ह्याच त्याला खूपच कौतुक वाटत होत. रोहितला निला आवडायला लागली होतीच पण रोहितनं पण निलाच्या पाच वर्षांपूर्वी बोलुन दाखवलेल्या द्रुढ निश्चयावर कुठे तरी सुरुंग लावला होता. ती कदाचित रोहितच्या प्रेमात पडली होती. पण हे सगळ व्हायला तब्बल दोन वर्ष लागली.

आणि परवा रोहितन तिला लंच करता बाहेर बाहेर एका रेस्टॉरंटमध्ये जायची ऑफर केली तिनेही अगदी आनंदानं स्वीकारली. गप्पांच्या ओघात त्यान मुख्य मुद्द्याला हात घातला.
"निला, तुला माहितेय मी आता ३४ वर्षांचा झालोय."
"बरं मग"
निला खळखळून हसायला.
"माझ लग्नाचं वय निघुन चाललय."
"चाललय? का गेलय?"
आणि ती परत हसायला लागली तसा तो हि हसायला लागला. मग थोडा गंभीर होत तो म्हणाला.
"तुला माहितेय मी इतके वर्ष लग्न का नाहि केलं ते."
"तुला कोणी पसंत केलच नसेल."
आणि ती परत हसायला लागली पण त्याच्या गंभीर चेहर्‍याकडे पाहुन ती शांत झाली.
"कारण इतक्या वर्षात मला कोणी निला मिळालीच नाहि."
निला एकदम गंभीर झाली.
"रोहित!"
"निला, खर सांगु जशी मुलगी मी इतके वर्ष शोधत होतो तू अगदी तशीच आहेस."
"स्टॉप इट रोहित."
"निला, अगदी मनापासून सांग तुला सुद्धा मी आवडतो ना? मला माहिती आहे मी जे बोलत आहे ते ऐकण तुला कठिण जातय पण निला तू अशी किती वर्ष दैवाशी एकटिच झुंज देत राहणार आहेस? गेले दहा वर्ष तू एका अशाश्वताची वाट पहात जीवन जगत आहेस ज्याची साधी चाहुलहि लागत नाहिये. तू तरुण आहेस, सुंदर आहेस. तू फक्त ३२ वर्षाची आहेस आणि हे सोन्यासारखे आयुष्य तुझ्यापुढे आहे."
निलाला काय बोलाव तेच सुचत नव्हतं. तिच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. रोहित जे बोलत होता ते अगदी खर होत, तिला तो मनापासून आवडत होता आणि एव्हाना ती त्याच्या प्रेमातही पडली होती हे ती सुद्धा जाणत होती.
"निला, मला तुझी आयुष्यभर साथ करायला आवडेल, लग्न करशील माझ्याशी? मी तुला कोणतीच जबरदस्ती करत नाहिये. तुझा जर नकार असेल तर मी तो सुद्धा स्वीकारायला तयार आहे. फक्त एवढच कि कुठलाही निर्णय तू घाईघाईत घेउ नकोस."
निलाचे डोळे भरुन आले होते. तिला काय बोलायच काहिच सुचत नव्हत तिच्या मनाची पूर्णपणे द्विधा अवस्था झाली होती. ती काहिच बोलत नव्हती.
मग निलाचा हात हातात घेत तो म्हणाला.
"निला, मला माफ कर जर मी तुला दुखवल असेल तर पण मी जे बोललो त्यावर अगदी शांतपणे विचार कर. मी तुझ्या निर्णयाची वाट पाहिन."
निलान डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिल आणि काहिच न बोलता तेथून निघुन गेली.

इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिनं झोपताना संजीवशी संवाद साधला नव्हता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. पावसान त्या शांत तळ्यात जणु उलथापालथ केली होती. निलाच्या मनाची अवस्था त्या तळ्यापेक्षा वेगळि नव्हती. रात्री कधी झोप लागली तिचीच तिला कळल नाहि. सकाळि तिला रोज पेक्षा जरा लवकरच जाग आली. बाहेर अजुनहि रिपरिप पाऊस पडतच होता. ती कॉफीचा कप हातात घेऊन गॅलरीत उभी होती आणि एकटक त्या समोरच्या तळ्याकडे पहात होती. तळ्यातल पाणी आता बर्‍यापैकी शांत होत पण रिपरिप पडणार्‍या  पाऊसामुळे अजुनहि वर्तुळ उठतच होती. कॉफी संपली तस तिनं कप टेबलवर ठेवला आणि मागे वळुन पहिलं, संजीव नेहमीप्रमाणे शांत झोपला होता. ती बेडरुममध्ये आली आणि संजीवच्या उशाशी बसली. तिनं खूप प्रेमाने त्याच्या केसातुन हात फिरवला आणि त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. तिचे डोळे परत भरुन आले. मग त्याचा हात तिनं स्वतःच्या हातात घेतला आणि ती त्याच्याशी बोलु लागली.

"हे सगळ काय चाललंय संजीव? मी माझ्या निश्चया पासून का डगमगत आहे? मागे एकदा आईनी जेव्हा दुसर्‍या लग्नाबद्दल विचारल तेव्हा मी त्यांना ठाम नकार दिला होता आणि आज तिच मी एवढि दोलायमान का झाले? माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि रोहित मला आवडतो. मला नाहि माहिती पण कदाचित मीही त्याच्यावर प्रेम करायला लागले आहे. संजीव उठ काहि तरी बोल"
ती परत हमसून हमसून रडायला लागली. मग एक मोठा आवंढा गिळत ती म्हणाली.
"रोहित मला आवडतो पण तुला सोडून त्याच्याशी लग्न कस शक्य आहे ते. आपली दहा वर्षाची साथ अशी मी एका झटक्यात कशी सोडु शकते. तूच माझ सर्वस्व आहेस आणि माझ तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे."
"मी तुला सोडून कधीच जाऊ शकत नाहि."
ती कदाचित आता एका निर्णयापर्यंत येऊन पोहोचली होती.
ती त्याच्या हातावर आपल डोकं ठेवुन रडु लागली. तेवढ्यात तिला संजीवच्या बोटांमध्ये हालचाल जाणवली तसे तिनं चमकून त्याच्या हाताकडे पाहिल तर त्याची बोट हालत होती. मग तिनं त्याच्या चेहर्‍याकडे पाहिल आणि संजीवने आपले डोळे उघडेले होते... 
 

२ टिप्पण्या:

  1. नमस्कार
    १५ भारतीय भाषांमधील मोबाईल ई-बुक्सचे एकमेव वितरक व प्रकाशक असलेले डेलीहंट यांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी संपर्क साधत आहे. आपल्या ब्लॉगवरील साहित्य ई-बुक्स स्वरुपात प्रसिद्ध करण्यास आपण उत्सूक असाल तर आपल्याला मदत करायला आम्हाला आनंद होईल. आपले स्वतःचे लेखन असल्यास तेही आपण इथे प्रसिद्ध व वितरीत करू शकता. डेलीहंटवर तुम्ही हे साहित्य विकत किंवा मोफत ठेवू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. रितसर करारपत्र होऊन सर्व व्यवहार ऑनलाईन केले जातात. याशिवाय आम्ही बुक्स बुलेटीन नावाचा एक ब्लॉग चालवतो. त्यात तुम्ही लिखाण करू शकता. आमच्यासोबत काम करण्याची आपली इच्छा असल्यास आपण जरूर संपर्क साधा – pratik.puri@dailyhunt.in

    उत्तर द्याहटवा

प्रतिक्रिया नोंदवा